आजपर्यंत 'कास पठार' बद्दल खूप ऐकलं होतं.. वाचलं होतं ! एकदा तरी तिथे जायची खूप मनापासून इच्छा होती! आज तो योग जुळून आला होता. बाप्पांच्या उत्सवामध्ये हा योग आला म्हणजे बाप्पांनी योग घडवूनआणला होता असं म्हटलं तरी चालेल !
सकाळी बरोब्बर सहा वाजून अठरा मिनिटांनी 'गणपती बाप्पा मोरया' चा आम्ही गजर केला आणि गाडी जागची हलली. मस्तपैकी मेथीचे पराठे आणि चटणी असं ब्रेकफास्ट झाला. पोटातले कावळे आता शांत झाले होते. अंताक्षरी मस्त रंगली होती. चिल्लर पार्टीचा तर नुसता धुडगूस सुरु होता बसमध्ये ! कोणीही आई-बाबांचं ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हतं... वाई फाट्याच्या थोडं पुढे सगळ्यांना हवाहवासा टी ब्रेक झाला. गरम गरम चहा पोटात गेल्यावर बरीच तरतरी आली.
'अजिंक्यतारा' किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं छोटंसं पण शांत आणि टुमदार असं सातारा शहर ! चहूबाजूंनी हिरवाईनं वेढलेलं ! शहरातूनच अगदी मध्य वस्तीतून एक मोठ्ठा बोगदा गेलाय ! बोगद्याचं अप्रूप फक्त छोट्यांनाच नाही तर आपल्यालाही किती असतं हे जाणवत होतं !
गाडी आता सातारा सोडून 'कास' च्या रस्त्याला लागली होती. शेवटी शेवटी का होईना, वरुणराजानं थोडी कृपा केलेली असल्यामुळे सगळा आसमंत मस्त हिरवागार होता ! दाट झाडी आणि त्यात वसलेलं सातारा शहरगाडीत बसून खिडकीतून बघायला खूपच छान वाटत होतं ! हिरव्या हिरव्या गवतातून छोटी छोटी पिवळ्या रंगाची फुलं डोकं वर काढून हसत होती... हिरवं पोपटी गवत आणि त्यावर पिवळ्या फुलांची ती नक्षी बघून मन हरखून जात होतं !
कास पठाराच्या पायथ्याशी गाडी पार्क केली आणि आम्ही पठाराच्या दिशेने चालायला लागलो. बरोबर भरपूर पाण्याच्या बाटल्या, बच्चे कंपनीसाठी खाऊ असा सगळा जामानिमा होता..चालता चालता निसर्गातले छोटेसोबती भेटायला लागले होते. रस्त्याच्या कडेच्या झुडूपामध्ये एक अगदी छोटं सरड्याचं पिल्लू फांद्यांवरून सरसरत जाताना दिसलं..हिरव्यागार छोट्या पानांवर अगदी छोट्या सुरवंटाच्या अळ्या मस्त पहुडलेल्याहोत्या...थोडं पुढे गेल्यावर हिरव्याजर्द पानांच्या पसाऱ्यात कोळ्यानं छानपैकी आपलं रुपेरी चमचमतं जाळं दाखवलं !
आता कास पठारावर पोचलो होतो आम्ही ! दूरवर लाल गुलाबी रंगाचे सुरेख पट्टे दिसत होते ! कधी एकदा तिथे जाऊन जवळून हा नजारा बघतोय असं झालं होतं ! गेटवर कॅमेऱ्याची फी भरली आणि आत शिरलो ! मनात खूप सारी excitement ... डोळ्यात खूप उत्सुकता...आश्चर्य...आनंद...अशा किती भावना होत्या हे सांगता नाही येणार !
हिरवंजर्द मऊ लुसलुशीत गवत...त्यावर निसर्गाने अक्षरशः रंगांची उधळण केली होती ! फिक्या अबोली रंगाचं 'अबोलीना'....गर्द निळ्या जांभळ्या रंगाचं 'नीलिमा'...
अगदी हुबेहूब 'मिकी माऊस'चा चेहरा असलेलं फूल ! अगदी तसेच मिस्किल डोळे..तसेच गोल गोल कान...मध्यभागी असणारं गोल नाक...! या फुलाचं नावही 'मिकी माऊस'च बरं का ! हिरव्यागार गवतावर सुंदर निळारंग ल्यालेली 'भुई कारवी' !
एक होतं 'रानवांगं' ! या रानवांग्याची पानं खूपच वेगळी होती..या पानांच्या पृष्ठभागावर चक्क काटे होते ! आणि या झुडुपाला अगदी अगदी छोटी छोटी हिरव्या रंगाची वांग्याच्या आकाराची फळं लागलेली होती ! म्हणून हे 'रानवांगं'!
एक तर होतं 'कंदील' ! अगदी कंदील जसा असतो तसाच आकार या फुलांचा ! आणि हे 'कंदील' आपल्या पाकळ्यांची उघड मीट सुद्धा करतात ! एक होतं 'झुंबर' ! छताला उलटं टांगलेलं झुंबर जसं दिसतं तसंच हे फूल...अगदी छोटी छोटी गुलाबी रंगाची झुंबरं...! एका फुलाचं नाव 'जरतारी'...त्या झुडुपाला छोटे छोटे तुरे आले होते.. त्यावर फुलं आली की त्यावर अक्षरशः जरीचं काम केलंय असं वाटतं ! म्हणून हे 'जरतारी' ! सोनेरीपिवळ्या रंगाची 'सोनकी' !
देवळात दीपमाळ असते तशीच पानांची रचना असलेलं एक छोटं झाड होतं. त्याचं नाव 'दिपकाडी'...! एका ठिकाणी थोडं पाणी साठलं होतं आणि त्यातल्या हिरव्या गवतातून इतके सुंदर पांढरे, जांभळे तुरे वर येऊन डुलत होते..! त्यांचं खूप छान प्रतिबिंब पाण्यात पडलं होतं...एकेक फूल किती सुंदर आहे ते अगदी जवळून पाहिल्यावरच कळत होतं..!
आम्ही सगळेच अनभिज्ञ होतो. कुणाला कसलीच माहिती नव्हती पण केदार आणि चित्राने खूप छान माहिती सांगितली प्रत्येक फुलाची..पानांची..त्यांच्या वैशिष्ट्यांसकट...!
ज्यांना खरंच निसर्गाचे फोटो काढायची खूप मनापासून आवड आहे, ज्यांच्याकडे तसा कॅमेरा सुद्धा आहे..त्यांच्यासाठी कास पठार म्हणजे खरोखर उत्तम जागा आहे...एकेका फुलाचा, त्याच्या पाकळ्यांचा क्लोज-अप घेतल्यावर त्याची खरी ब्युटी समजते !
प्रत्येक फुलाचं...प्रत्येक पानाचं सौंदर्य वेगळं...प्रत्येकाचा रुबाब वेगळा...
दुरून पाहिल्यावर हिरव्याजर्द गवतावर पसरलेले कितीतरी रंगांचे पट्टे दिसतात...एखादा पट्टा फक्त पिवळ्या रंगाचा तर अजून एखादा सुरेख फिक्या गुलाबी रंगाचा...कुठे फक्त गडद निळा-जांभळा रंग सांडलेला....!
या फुलांचं आयुष्य खूप थोडं असतं...! खूप लवकर कोमेजून जातात ही फुलं ! पण इतक्या कमी आयुष्यात आपल्याला फक्त निखळ आनंद देतात... आपल्याकडून कसल्याच परतफेडीची अपेक्षा न ठेवता !
त्यांच्याकडे पाहिल्यावर जाणवत राहतं की निसर्गाचं हे किती निर्व्याज, निरागस रूप आहे...!
हा निसर्गाचा खरंच खूप सुंदर आविष्कार आहे.. माणसांनी कुठल्याही प्रकारचे वेगळे प्रयत्न न करता फक्त वरुणराजाच्या कृपेमुळे होणारा निसर्गाचा हा चमत्कार एकदा तरी बघण्यासारखा !
कास पठार आता 'World Heritage Site ' म्हणून जाहीर झालंय !
आपल्या ओंजळीत निसर्गाने भरभरून दिलेलं हे दान आपण तितक्याच संवेदनशील मनानं जपायला हवं..!
आपल्या वागण्यामुळे तिथली फुलं पायदळी तुडवली जात नाहीयेत ना ? आपली फोटोग्राफीची आवड जपताना नकळतपणे तिथल्या निसर्गाच्या या निष्पाप रुपाला कुठे इजा तर पोचत नाहीये ना ? एवढी कमीत कमीकाळजी तिथे भेट द्यायला जाणाऱ्या लोकांनी घेतली तरी खूप काही साध्य होईल !
धन्यवाद त्या क्षणांना ज्यांनी भरभरून आनंद..समाधान....आपल्या ओंजळीत घातलं आणि आपल्या अनुभवाच्या शिदोरीत अजून काही मोलाच्या अनुभवांची भर घातली !
सगळ्यात जास्त धन्यवाद द्यायला हवेत iCampers च्या केदार आणि चित्राला ज्यांनी ही सहल खूप छान organize केली.
कुणाला कसलाही त्रास न होता सगळं व्यवस्थित पार पाडलं...
सुप्रिया गाडे @iCampers
सुप्रियानी सुंदर, लयबद्ध लिहिलेल्या प्रवास वर्णनाला थोडासा फोटोग्राफीचा साज चढविण्याचा प्रयत्न करतो...
लाखो वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीमुळे झालेला सपाट कठीण खडक आणि ऊन, वारा, पाऊस यामुळे त्याची झालेली झीज, ही आहे कास पठाराच्या निर्मितीची गाथा. मातीचा थर जेमतेम एक इंच. इवलुश्या रोपाट्याच्या मुळांना वाढण्यासाठी तेवढीच जागा. पावसाळा संपता संपता श्रावण धारांच्या पाण्याने छोटी छोटी रोपटी इथे रुजू लागतात. सात आठ दिवसातच गुलाबी, जांभळी, पिवळी फुलं हिरव्या गालीच्यातून बाहेर डोकाऊ लागतात. जेमतेम १ महिन्याचा जीवनकाळ असणारी ही सुंदर रोपं कासचा चेहेरा मोहराच बदलून टाकतात. iCampers पुन्हा एकदा सज्ज होतात या निसर्गाच्या शिळेला हाक देण्यासाठी...
सर्वांना पर्यावरणातील या छोट्या रोपट्यांची नावे, पश्चिम घाटातील त्यांचे धोक्यात असणारे भवितव्य याची माहिती देऊन होते. आपल्यामुळे कोणतेही रोपटे तुडवले जाणार नाही याची काळजी घेत, आणि कोणताही कचरा न करता शिस्तबद्ध पद्धतीनी सर्व फुलांची माहिती घेत आणि photography करत आमची सहल चालू होते.
निसर्गासाठी पर्यटक जितका चांगला तितकाच कधीकधी घातकही ठरू शकतो. अशाच काही जणांना आम्ही हळूच फुले तोडून पर्स मध्ये ठेवताना आणि काहीना त्या फुलांमध्ये फतकल मारून selfi काढताना पहिल. काही शहाण्यांना शब्दांचा मार देखील देऊन पहिला. कधीतरी सगळे सुजाण होतील अशी अपेक्षा ठेऊन पुढे जाऊ लागलो .
इथे कीटक भक्षक वनस्पती (Carnivorous plants) सुद्धा आढळतात. आम्हाला सहलीच्या सुरवातीसच दोन्ही जातीच्या भक्षक वनस्पती सापडल्या. त्या पाहून, फोटो काढून झाल्यावर आम्ही इतर फुलांकडे आमचा मोर्चा वळवला.. आणि या पुढे चालू झाली Macro Photography. मला शब्दांमध्ये बसवता न आलेल्या या सर्व फुलांचा फोटोतूनच आस्वाद घेऊया ...
धन्यवाद, केदार कुलकर्णी @iCampers !!
|
लाल दवबिंदू / Drosera Burmani (Rare) |
|
Drosera Burmani with kill (Rare) |
|
दवबिंदू / Drosera Indica (Rare / Endangered) |
|
दवबिंदू / Drosera Indica (Rare / Endangered) |
|
दवबिंदू / Drosera Indica (Rare / Endangered) |
|
सोनकी /Senecio Bombayensis |
|
सोनकी /Senecio Bombayensis |
|
निलिमा |
|
निलिमा |
|
निलिमा |
|
विघ्नहर्ता (रानघेवडा) / Vigna Vexillata |
|
गेंद (धनगर गवत) / Eriocaulan Sedgewikii (Endemic) |
|
गेंद (धनगर गवत) / Eriocaulan Sedgewikii (Endemic) |
|
भुई कारवी / Strobilantas Sessilis |
|
जरतारी / Flemingia Gracitis (Rare) |
|
जरतारी / Flemingia Gracitis (Rare) |
|
रानवांग |
|
रानवांग्याच पान |
|
कंदील पुष्प / Ceropegia Vincaefolia (Acute Endemic / Critically Endangered) |
|
Ceropegia Vincaefolia Buds (Acute Endemic / Critically Endangered) |
|
पाषाणी / Striga Gesnerioides |
|
सीतेची असावं / Utriculuria Parparanscens |
|
अबोलीना/ Murdannia Lanigunosa (Endemic / Endangered) |
|
अबोलीना/ Murdannia Lanigunosa (Endemic / Endangered) |
|
अबोलीना/ Murdannia Lanigunosa (Endemic / Endangered) |
|
How many eyes do I have.. |
|
जांभळा तेरडा |
|
दिपकाडी / Dipkadi Montanum (Rare) |
|
Dipkadi Montanum Seed (Rare) |
|
कावळा / Micky Mouse Flower / Smithia Begemina |
|
गेंद (Endemic) आणि निळी मंजिरी |
|
|
|
जांभळी मंजिरी (Pogastemon Deccaneces) आणि गेंद(Eriocaulan Sedgewikii) (Endemic) |
|
निसुरडी |
|
पंद / Pinda Caccanaeis |
|
आभाळी / Cyanotis Cristata (Rare / Endangered) |
|
भारंगी / Clerodendrum Scrratum |
|
Diamonds |
|
And other flowers |
|
Our Gang (Kedar, Chitra, Shreya, Omkar, Ninaad, Supriya, Kirti, Sanika, Vedika,
Sachin, Maushami, Seemit, Naman, Milind, Rupali, Shriya, Abhijit, Meenal,
Parth, ,Tanuja, Pratibha, Vibha, Apoorva, Amit, Anjali, Aditi,
Reshma) |
|
Thank You |
धन्यवाद !!
No comments:
Post a Comment