Showing posts with label Godwit. Show all posts
Showing posts with label Godwit. Show all posts

Thursday, 27 December 2018

Bhigwan-16th December 2018 - Author - Supriya Gade


दरवर्षी डिसेंबर महिना आला की पेपरमध्ये फ्रंट पेज ला मोठी बातमी असायची, 'हिवाळा सुरु झाल्यामुळे फ्लेमिंगो (रोहित) पक्षी उजनीच्या जलाशयावर मोठ्या संख्येने आले आहेत.' ही बातमी वाचली आणि फ्लेमिंगोंचे सुंदर रंगीत फोटो पाहिले, की मनाच्या एका कोपर्यात दबा धरून असलेली भिगवणला जाण्याची इच्छा उसळी मारून वर यायची !
अशातच २४ नोव्हेंबरला whats app वर भिगवण आणि मयुरेश्वरची ट्रिप आखल्याचा केदारचा मेसेज आला आणि अगदी लगेचच त्याला माझं भिगवणचं नक्की असल्याचा रिप्लाय केला.

१६ डिसेंबर तारीख ठरली होती. जाण्याचा दिवस जसजसा जवळ येत होता, तसतशी excitement वाढत होती. खूप उत्साहात दुर्बिणीची खरेदी झाली.

एरवी डिसेंबर महिन्यातल्या थंडीतल्या रविवारची सुट्टी म्हटलं की लवकर वगैरे उठण्याचे विचार मनाच्या आसपाससुद्धा फिरकत नाहीत. पण त्या दिवशीचा लवकर उठण्याचा उत्साह काहीसा वेगळाच होता. त्याच उत्साहात स्वारगेटहून पहाटे साडेपाच वाजता निघालो.

गाडीत बसल्यावर जरावेळ डुलकी लागली, पण थोडा वेळ गेला आणि खिडकीच्या काचेतून दिसणारी हिरवीगार शेतं बघून मन ताजंतवानं झालं. मधूनच एखादा बळीराजा त्याच्या सर्जा-राजाच्या जोडीच्या मदतीने काळ्या आईची मशागत करत होता.छोट्या छोट्या टुमदार बैठ्या घरांच्या अंगणात कोंबड्या आणि त्यांची पिल्लं बागडत होती. सातच्या सुमारास भिगवणपासून साधारण ४ ते ५ किमी अंतरावर असलेल्या 'कुंभारगाव' इथे पोहोचलो. एव्हाना पोटातले कावळे चांगलेच जागे झाले होते. ब्रेकफास्टसाठी मस्तपैकी कांदे-पोहे आणि गरम गरम चहा असा आवडता मेनू होता. कांदे-पोह्याचा मनापासून आस्वाद घेताना बाजूच्या कठड्यावर आपल्या रोजच्या जगण्यातून आता गायब झालेल्या चिऊताई खूप दिसल्या. साधी इवलीशी चिमणी दिसल्यावर आनंद होणारं वय केव्हाच सरलंय आता. पण खूप आनंद झाला खरा ! पोटातले कावळे शांत झाल्यावर छान तरतरी आली होती. उजनी धरणाच्या जलाशयाकडे आम्ही बोटीत बसण्यासाठी निघालो. जाताना वाटेतच काही रंगीबेरंगी सुरेख पक्षी दिसले.

शांत, संथ जलाशयाच्या पाण्यावर चमचमत्या कोवळ्या सूर्यकिरणांनी चांदण्यांचे तरंग उमटवले होते.
आमची बोट आता फ्लेमिंगोंच्या दिशेने निघाली होती.

त्याच वाटेवर पाण्यात शाळा भरल्यासारखे बसलेले 'वारकरी' पक्षी दिसले. काळाभोर रंग आणि कपाळावर टिळा लावलाय असं वाटणारा छोटा पांढरा ठिपका ! आमची बोट आता फ्लेमिंगोंपासून काही अंतरावर होती.एक मोठ्ठा फ्लेमिंगोंचा ग्रुप आमच्यापासून सुरक्षित अंतरावर शांतपणे उभा होता. एका पायावर आपलं छोटंसं शरीर छान तोलून, दुसरा पाय पंखांमध्ये दुमडून घेऊन त्यांची छान विश्रांती चालली होती. मधूनच त्यांच्यापैकी काहींनी उडण्यासाठी आपले पंख पसरले आणि पंखांचा सुरेख लाल-केशरी रंग दाखवून आपलं 'अग्निपंख' नाव किती सार्थ आहे, हे दाखवून दिलं ! त्याच ठिकाणी आम्ही 'चित्रबलाक' (Painted Storks) सुद्धा खूप पाहिले.

सांडपाण्याच्या ठिकाणी हमखास आपली हजेरी लावणारे 'शेकाटी' (Black Winged Stilt) हे पक्षीही खूप दिसले. 'राखी बगळा' (Grey Heron), 'वंचक' (Pond Heron) यांनीही आपलं दर्शन घडवलं.
याशिवाय आम्हाला 'खंड्या' (Kingfisher), 'पिवळा धोबी' (Yello Wagtail), 'टिटवी' (Red-wattled Lap wing) हे सोबती पण दिसले. चमच्याच्या आकाराची चोच असलेले 'चमचा' (Spoonbilled) मस्त हवेत तरंगत होते.

आता ऊन चांगलंच जाणवायला लागलं होतं. iCampers च्या Sun Caps ने उन्हाच्या झळांपासून डोकी वाचवली. पोटातल्या कावळ्यांनी परत एकदा आपलं अस्तित्व दाखवायला सुरवात केली होती.दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. गरम गरम खरपूस चुलीवरची भाकरी, पिठलं आणि डाळ भात असं साधाच पण चवदार बेत होता. मस्तपैकी तुडुंब जेवून परतीच्या वाटेकडे निघालो.
खूप वेगवेगळे, सुंदर रंगांचे, रूपाचे पक्षी बघायला मिळाले होते. पण या सगळ्यावर कळस तेव्हा झाला, जेव्हा आम्हाला 'White Stork' दिसला ! भरतपूरच्या Bird Sanctuary मधेही हा ‘White Stork’ दिसल्याची गेल्या पंधरा वर्षात नोंद झालेली नाही ! अशा या इतक्या दुर्मिळ असलेल्या पक्ष्याची एक जोडी भिगवणला आहे असं केदारला कळलं होतं. जलाशयाच्या काठाकाठाने गाडी चालवत, दुर्बीण तयार ठेवून 'White Stork' कुठे दिसतोय का याचा अगदी बारकाईने केदार शोध घेत होता. बरंच अंतर उलट्या दिशेने गेल्यावर एका काठावर रुबाबात उभा असलेला 'White Stork' आम्हाला दिसला ! इतका दुर्मिळ असलेला हा पक्षी त्या दिवसाचा 'हिरो' ठरला असं म्हटलं तरी चालेल ! आमच्या ग्रुपमधल्या अनेक कुशल फोटोग्राफर्सनी अतिशय skillfully त्याचे सुरेख फोटो घेतले.
भीमा नदीवर बांधलेल्या उजनी धरणाचा क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्रात पहिला नंबर लागतो. एव्हढी मोठी जलक्षमता असल्याने या तलावात मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात.
या जलाशयातील उथळ पाणी, पाण्याबाहेर येणारी दलदलयुक्त बेटं, पाणथळीच्या जागा या सगळ्यामुळे हे पक्ष्यांसाठी  अतिशय अनुकूल आणि पोषक असं ठिकाण बनलंय. मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारं अन्न आणि घरटी बांधण्यासाठी मिळणारी सुरक्षितता यामुळे फ्लेमिंगों सारखे परदेशी पाहुणे आणि देशी पक्ष्यांचं हे 'Favorite Destination’ ठरलं आहे. भिगवणचे स्थानिक लोक या स्थलांतरित पक्ष्यांची आणि इथल्या पर्यावरणाची छान काळजी घेत आहेत.
तिथे येणारे हौशी पक्षीनिरीक्षक आणि अभ्यासक यांना राहणं, जेवण, गाईड इ. सुविधा पुरवण्याबरोबरच पक्ष्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही त्यांनी हसतमुखाने पेलली आहे.
दौंड-पाटस फाट्यावर गाडीने वळण घेतलं. कच्च्या खडबडीत रस्त्यावरून आम्ही 'मयुरेश्वर' ला निघालो होतो. वाटेत 'भीमा सहकारी साखर कारखाना' लागतो.

'मयुरेश्वर' हे एक अतिशय विरळ आणि खुरटं असं जंगल आहे. चिंकारांना जगण्यासाठी असंच जंगल आवश्यक असतं. खूप चिंकारा बघितले तिथे. दिसायला अतिशय रुबाबदार, नागमोडी डौलदार शिंगं असलेला 'चिंकारा' हा हरिणाच्या कुळातला प्राणी मुळातच खूप लाजरा-बुजरा आहे. आमची चाहूल लागून सावध होऊन त्यांनी पळून जाऊ नये म्हणून गाडीतून खाली न उतरता गाडीच्या खिडकीतूनच त्यांचा मुक्त संचार आम्ही बघितला. या 'मयुरेश्वर' च्या जंगलात आम्ही सुंदर हिरव्यागार रंगाचे 'वेडा राघू' (Green Bee Eater) हे पक्षी खूप बघितले.

मयूरेश्वरहून परतताना सूर्य कलायला लागून तिन्हीसांज झाली होती. मस्त गरम गरम चहाची एक फेरी झाली आणि आम्ही घराची वाट धरली. मन अजूनही रेंगाळतच होतं भिगवणच्या शांत जलाशयावर. चिंकारांच्या डोळ्यातले निष्पाप भाव आठवून उगाचच एक हुरहूर लागून राहिली होती.
वाटत होतं, किती मुक्त..स्वच्छंदी...मनस्वी आहे या चिमुकल्या जीवांचं जगणं !
तसं पाहिलं तर त्यांचं आयुष्य फारच कमी असतं. पण इतक्या छोट्या आयुष्यातसुद्धा त्यांच्या फक्त असण्यातच आपला केव्हढा मोठा आनंद सामावलेला असतो !

निसर्गाचं हे सुंदर रंग आणि रूपाचा साज चढलेलं लेणं आणि त्यांचं कोवळं..निष्पाप..निरागस जग आपलंच जगणं समृद्ध करून जातं !!

ट्रिप तर मस्तच झाली होती. कुठलाही पक्षी दिसला की केदार त्याचा इंग्लिश आणि मराठीतलं नाव, त्याची इतर वैशिष्टयं अशी खूप छान माहिती सांगायचा. त्यामुळे आधीच्या थोड्याशा माहितीमध्ये भर पडत होती. दिवसभर अनुभवलेल्या खूप सुंदर क्षणांनी ओंजळ भरली होती !

केदार आणि चित्रा..तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद इतकी छान ट्रिप आखून आम्हाला निसर्गाचं इतकं सुखावून टाकणारं दर्शन घडवल्याबद्दल !!


Indian Robin Female on Sumit's car mirror

Openbill Stork

Bar Header Geese

Whiskered Tern

Grey Heron

River Tern with kill

Pond Heron

Openbill Stork

Garganey Ducks

Great Egret

Painted Storks

Brown Headed Gulls

Greater Flamingo V Formation

Brown Headed Gulls

Painted Storks and Brown Headed Gulls

Grey Heron

Greater Flamingos

Flamingos Landing

Brown Headed Gulls

Painted Storks

Brown Headed Gulls

Flamingos Resting and Painted Storks Flying over them

Pond Heron

Sandpiper which has lost its one leg

Grey Heron got a big kill

Marsh Harrier

Purple Swamphen

Common Kingfisher

Grey Heron and Whiskered Terns

Purple Swapmhens

Ruddy Shelducks

Black Tailed Godwit

Little Ringed Plover

White Stork

White Stork

White Stork in Flight

Baybacked Shrike

Green bee-eater

Indian Bush Lark

Chinkara on Mayreshwar backdrop

Chinkara Male / Indian Gazelle



Birds of a feather flock together







Wednesday, 11 February 2015

भिगवण - जानेवारी २०१५

आज बरेच दिवसांनी मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. बघूया जमतंय का ? आजवर बरेचसे लेख इंग्रजीमध्ये लिहून देखील माझी बोली भाषा मराठीच आहे.  या भाषेत आपण कधी काही लिहिलं नाही अशी हुरहूर लागून राहिली होती, म्हणून हा पहिला प्रयत्न. सांभाळून घ्या.

हाक मारल्यावर लगेच १० मित्र गोळा होणं हे  सध्या Whatsapp आणि facebook या ठिकाणीच शक्य असतं असे बरेच लोकांचे म्हणणे आहे. पण हे काही सर्वस्वी खरं नाही हे मला आता ठाऊक झालंय. जर एकत्र येण्याच कारण तितकच सुंदर असेल तर मित्र गोळा होणार आणि पुन्हा पुन्हा मित्रांबरोबर मजा करता येते. आजकाल ही मजा सर्वांच्या नशिबात नसली तरी मी आणि माझे मित्र ही मजा वारंवार लुटतो.

दर वर्षीप्रमाणे हजारो मैल प्रवास करून येणारे रोहित पक्षी बघण्यासाठी आमचे सर्व मित्र वाट पाहत असतात. ते आले कि भिगवण जलाशयावरून नावाडी मला फोने करून कळवतात आणि मग एक सोयीस्कर सुटीचा दिवस पाहून मी माझ्या मित्रांना घेऊन या स्थलांतर करणाऱ्या पक्षांना बघायला जाण्याचा घाट घलतो. दर वर्षी काही नवीन आणि काही जुन्या मित्रांना घेऊन आम्ही भिगवणला जातो. या वर्षी १७ जानेवारीला आम्हा मित्रांचा पुन्हा एकदा या स्थलांतर करणाऱ्या पक्षांना बघण्याचा कार्यक्रम ठरला.

आमचा ग्रुप

माणूस कितीही सज्ञान झाला तरी पक्षी स्थलांतर का करतात, कधी करतात, त्यांना मार्ग कसा लक्षात राहतो, ते रस्ता चुकतात का, नव्यानी जन्मलेले पक्षी इतका लांबचा पल्ला कसा पार करतात, परत जायला कधी निघायचे ते त्यांना बरोबर कसे समजते असे अनेक प्रश्न १००% उत्तरीत नाहीत. शेकडो वेगवेगळ्या जातीचे पक्षी असेच दर हिवाळ्याला  महाराष्ट्रात येतात. ७-८ cm लांबीचे आणि  १०-१२g वजनाचे छोटे छोटे पक्षी हजारो मैलाचा प्रवास कसा करतात, किती दिवसात करतात आणि त्या चिमुकल्या पंखात हे बळ येत कुठून हे देखील कोडच आहे. 

प्रश्न जरी निरुत्तर असले तरी पुन्हा पुन्हा त्यांना बघण्यात आणि थोडाफार त्यांकडून आणि थोडाफार मित्रांशी चर्चा करून जाणून घ्यायचा प्रयत्न करण्यात खरी मजा आहे. ठरल्याप्रमाणे सकाळी सव्वा सहाला स्वारगेट जवळ भेटलो आणि carpool करून दीड दोन तासात भिगवणला पोहोचलो. नावाडी आमची वाटच पहात होता. या वर्षी अमाप संख्येने आलेल्या रोहित पक्षांनी देखील आमच्या डोक्यावरून भरारी मारून आणि आपले अग्निपंख दाखवून सर्वांची मन जिंकली.

रोहित पक्ष्यांचा थवा

या वेळेला रोहित पक्षांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच जास्त असल्याचा मला प्रकर्षानी जाणवलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या भीमेच्या त्या पाण्यावर असंख्य पक्षी होते. रोहित पक्षी देखील हजारोंच्या संख्येनी पाण्यामध्ये किलबिलाट करत आणि पाण्यातील alge खाण्यात गुंतले होते. नेहमी लांबवर दिसणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या किनाऱ्याकडे नाव नेणाऱ्या नावाड्याला या वेळेस फारसा प्रयास करावा लागणार नव्हता. पक्षी अगदीच जवळ आणि लगेच दिसण्याच्या अंतरावर होते. नावाड्याकडे चहा घेऊन आम्ही २०-२२ लोक २ होड्यात बसून या पक्षांना जरा  जवळून पाहण्यासाठी आणि फोटोग्राफी करण्यासाठी निघलो.

पक्षी निरिक्षण
थोड्याच वेळात जवळून जाणाऱ्या (Northern Shoveler male)  थापटया (नर) पक्ष्याने आमचे लक्ष वेधले. रुबाबदार दिसणाऱ्या या पक्ष्याच्या चोचीच्या आकारामुळे त्याला Shoveler असे नाव मिळाले आहे. त्याचा पिवळा धमक डोळा त्याच्या गडद हिरव्या रंगाच्या डोक्यावर उठून  दिसतो.

थापटया (नर)

पक्षांमधे नर हे माद्यांपेक्षा सुन्दर असतात हे आपल्याला मोर पाहून ठाऊक आहेच. तसाच प्रकार बऱ्याच पक्षांमधे दिसून येतो.

थापटया (मादी )

मासे पकडायच्या जाळ्यावर बसलेला शिरवा सुरय (Whiskered Tern) देखील फोटोची वाटच पाहत होता जणू ..

शिरवा सुरय
बघता बघता आम्ही रोहित पक्षांच्या जवळ  जाऊन पोहोचलो. मोठ्या संख्येने आलेल्या पाहुण्यांना पाहण्याची मजाच काही न्यारी आहे. खाण्यामध्ये आणि आपापसात अधून मधून भांडण्यात सगळे गुंतले होते. कधी बोटी जवळ आल्या तर आपली दिशा बदलत होते.

ऐट
Closeup
थोड़ भांडण
या सर्वांचं सम्मेलन बघून किती फोटो काढू आणि किती नको असं होतं.

Panaroma

सावधान

विश्राम

या पक्ष्यांना उडताना बघण्याची मौज काही औरच. पाण्यावरून पळत जाऊन आपल्या अग्निपनखानी आकाशाकडे झेपावणारे हे रोहित पक्षी तासंतास बघत राहावे असे वाटते. पंखाखालील लाल रंग पाहून हा पक्षी मशाल घेऊनच उडतो आहे असे भसते. त्यामुळेच या पक्षाला The Flame is going अर्थात  Flamingo असे नाव पडले असावे.

उड्डाण

The Flame is Going

Landing
थोड्याच वेळात एक मोठा रोहित पक्षांचा थवा या पक्षांना येऊन मिळाला. 

मोठा थवा
तासभर रोहित पक्षांची ऐट पाहून आम्ही इतर पक्षांना पाहण्यासाठी दिशा बदलली. सुंदर ऐटबाज राखी बगळ्यांनी (Grey Heron) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मासे पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दिमाखदार बगळ्याला आमच्या समोर तरी काही यश आलं नाही.

राखी बगळा
नंतर आम्ही जवळच्या एका किनाऱ्यावर चित्र बलाक (Painted Stork) पक्षांच्या थव्याकडे नाव वळवली. हा फारच सुन्दर आणि रंगवल्या सरखा पक्षी स्थानिक असला तरी फारच रुबाबदार आहे.

चित्र बलाक

चित्र बलाक

जोड़ी
शरीरापेक्षा उंच पाय असलेल्या शेकाट्या (Black Winged Stilt) या पक्षाला देखील चिखलात खाद्य शोधताना पाहायला मिळाले. तसा हा सांडपाणी, प्रदूषित किनारे यावर अजून टिकून राहिलेला स्थानिक पक्षी वारंवार दिसतो. शरीराच्या मानाने उंच पाय असलेल्या पक्षांमध्ये जगात सर्वप्रथम क्रमांक पटकावणाऱ्या या पक्षाला सारखा पहिला असल्याने फारसे कोणी याचे फोटो काढले नाहीत.

शेकाट्या

लेह लदाख मधून येणारा चक्रवाक पक्षी हा देखील माझा लाडका पक्षी आहे. त्याला त्याच्या स्थानिक ठिकाणी पाहून आल्यामुळे मला त्याच्याबद्दल जर जास्तच आपुलकी आहे. ६५०० km चा प्रवास आम्ही आमच्या कारनी केल्याबद्दल बऱ्याच लोकांनी आमचे कौतुक केले होते. दर वर्षी न चुकता प्रवास करणाऱ्या या पक्षाचं खरंतर किती कौतुक करायला पहिजे. या पक्ष्याकडे तर  mobile आणि google maps देखील नाहीत.

पुरातन संस्कृत श्लोकांमध्ये, सुभाशितांमध्ये आणि  कथांमध्ये आपल्या पूर्वजांनी या पक्षाचा बराच अभ्यास करून उल्लेख केला आहे. रथचक्र जसा आवाज करतं तसा आवाज काढणाऱ्या या पक्षाच नाव चक्रवाक ठेवाण्य्मागे सुद्धा जुन्या ornithologist पुर्वांजांची पक्षांबद्दलची आवड आणि अभ्यासू वृत्ती दिसून येते.

चक्रवाक (Brahminy Duck)

चक्रवाक् पक्षांची जोड़ी

इतक्या सर्व पक्षांना पुरेल इतके खाद्य या जलशयात आहे का, असा प्रश्न पडताच पाण्यावर उड्या मरणाऱ्या या माशांचे दर्शन झाले.

मासे
बाकीच्या पक्षांचे देखील सर्वानी भरपूर फोटो काढले.अनेक निरनिराळ्या बदकांमध्ये जाड भुवई असलेले Gargeni हे बदक देखील पाहिले. याचा मी प्रथमच फोटो काढू शकलो. एक सुंदर आणि जाड अशी पांढरी भुवई त्याच्या डोक्यावर पाहून मराठीमध्ये याचे  नाव भुवई असेच ठेवले आहे.

भुवई (Gargeni )
ठीबुकली हे भारतात सापडणाऱ्या बदकांच्या जातीतील बहुतेक सर्वात लहान बदक आहे. अतिशय चपळ असलेले हे बदक थोड्याश्या आवाजाने देखील पटकन पाण्याखाली जाते आणि लांब कोठूनतरी बाहेर येते. त्याला शोधण्यासाठी आपल्याला कुठे कुठे नजर फिरवावी हेच कळत नाही. 

ठीबुकली (Little Grebe)
या खेरीज काळ्या आणि तपकिरी डोक्याचे कुरव (black and brown headed gulls), वेगवेगळे सुरय (Terns) यांची पाण्यावर गर्दी होती.

काळ्या डोक्याचा कुरव (Black Headed Gull)

तपकिरी  डोक्याचा कुरव (Brown Headed Gull)

मुग्धबलाक (Open bill Stork) मोठ्या एकाग्रतेने पाण्यात काहीतरी शोधत होता. या पक्ष्याच्या चोचीमध्ये असलेल्या या फटीमुळे हा पक्षी खूप लांबून देखील ओळखता येतो.

मुग्धबलाक (Open bill Stork)

पाण्याच्या कडेला असलेल्या चिखलामध्ये या खेपेस खूप सारे काळ्या शेपटीचे  पंकज (Black-tailed Godwit) दिसले. यांची लांब लचक चोच आणि उंच पाय यामुळे हा पक्षी ओळखता येतो. बरेच दिवसांनी खूप सारे  Godwit पाहून आणि त्यांच्या लांब चोचींची तलवारबाजी बघायला खूप  मजा आली. उडताना लांब चोच आणि लांब पाय यामुळे हवेत हा पक्षी आगदी वेगळाच दिसतो.

मळगुजा, काळ्या शेपटीचा पंकज (Black Tailed Godwit)

मळगुजा, काळ्या शेपटीचा पंकज

कुदळीसारखी मोठी चोच असणाऱ्या कुदळ्या पक्षांच्या तीन जाती महाराष्ट्रात प्रामुख्याने दिसतात - Black headed Ibis, Glossy Ibis and  Black Ibis. त्यातील Black headed Ibis, Glossy Ibis या  जाती आम्ही इथेच पाहिल्या. सकाळच्या सोनेरी किरणांमध्ये चिमणा कुदळ्याचे पंख सुंदर लखलखत होते. मोठ्या चोचीने ते चिखलातील कीटक, गोगलगाई अशा अन्नाचा शोध घेताना दिसले. हा कुदळ्या इतर दोन जातींपेक्षा आकाराने छोटा असतो.

छोटा शराटी, चिमणा कुदळ्या

नौकाविहार करून झाल्यावर पायी एक चक्कर मारताना खंड्या पक्षाचे देखील दर्शन झाले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ३ प्रकारचे kingfisher दिसतात. त्या तिन्ही  (White breasted Kingfisher, common Kingfisher and Pied Kingfisher)  पक्षांना आम्ही इथे पाहू शकलो.

खंड्या (Common Kingfisher)

हिरवा बगळा (Green Heron)

नंतर नावाड्याच्याच घरी मस्त पैकी गावरान जेवणाचा आस्वाद घेतला. रोहित, भुरा बगळा, राखी बगळा आणि हिरवा बगळा यांच्या संगतीत जेवायला बसल्याचा अनुभव मिळाला. शिकारी पक्षांचे फारसे दर्शन झाले नाही असे आम्ही म्हणताच आम्हाला Marsh Harrier अर्थात पाण घार दिसली.  Wagtails (धोबी), sandpipers (तुतवार), plovers (चिखल्या), bushchats (कवड्या वटवट्या), green beaeater (वेडा राघू ) या सारखे अनेक छोटे पक्षी देखील पाहिले.

सर्व पक्षीमित्रांनी तर या सहलीची मज लुटलीच, पण मुलांनी सुद्धा आपला आपला मनोरंजनाचा पर्याय निवडला.

ओंकार
त्याच विषयावर परत परत लिहून देखील आपण माझ्या लेखामध्ये रस घेतलात या बद्दल धन्यवाद.