दरवर्षी डिसेंबर महिना आला
की पेपरमध्ये फ्रंट
पेज ला मोठी
बातमी असायची, 'हिवाळा
सुरु झाल्यामुळे फ्लेमिंगो
(रोहित) पक्षी उजनीच्या जलाशयावर
मोठ्या संख्येने आले आहेत.'
ही बातमी वाचली
आणि फ्लेमिंगोंचे सुंदर
रंगीत फोटो पाहिले,
की मनाच्या एका
कोपर्यात दबा धरून
असलेली भिगवणला जाण्याची इच्छा
उसळी मारून वर
यायची !
अशातच २४ नोव्हेंबरला
whats app वर भिगवण आणि मयुरेश्वरची
ट्रिप आखल्याचा केदारचा
मेसेज आला आणि
अगदी लगेचच त्याला
माझं भिगवणचं नक्की
असल्याचा रिप्लाय केला.
१६ डिसेंबर तारीख ठरली
होती. जाण्याचा दिवस
जसजसा जवळ येत
होता, तसतशी excitement वाढत
होती. खूप उत्साहात
दुर्बिणीची खरेदी झाली.
एरवी डिसेंबर महिन्यातल्या थंडीतल्या
रविवारची सुट्टी म्हटलं की
लवकर वगैरे उठण्याचे
विचार मनाच्या आसपाससुद्धा
फिरकत नाहीत. पण
त्या दिवशीचा लवकर
उठण्याचा उत्साह काहीसा वेगळाच
होता. त्याच उत्साहात
स्वारगेटहून पहाटे साडेपाच वाजता
निघालो.
गाडीत बसल्यावर जरावेळ डुलकी
लागली, पण थोडा
वेळ गेला आणि खिडकीच्या काचेतून दिसणारी हिरवीगार शेतं बघून मन ताजंतवानं
झालं. मधूनच एखादा बळीराजा त्याच्या सर्जा-राजाच्या जोडीच्या मदतीने काळ्या आईची मशागत
करत होता.छोट्या छोट्या टुमदार बैठ्या घरांच्या अंगणात कोंबड्या आणि त्यांची पिल्लं
बागडत होती. सातच्या सुमारास भिगवणपासून साधारण ४ ते ५ किमी अंतरावर असलेल्या 'कुंभारगाव'
इथे पोहोचलो. एव्हाना पोटातले कावळे चांगलेच जागे झाले होते. ब्रेकफास्टसाठी मस्तपैकी
कांदे-पोहे आणि गरम गरम चहा असा आवडता मेनू होता. कांदे-पोह्याचा मनापासून आस्वाद घेताना
बाजूच्या कठड्यावर आपल्या रोजच्या जगण्यातून आता गायब झालेल्या चिऊताई खूप दिसल्या.
साधी इवलीशी चिमणी दिसल्यावर आनंद होणारं वय केव्हाच सरलंय आता. पण खूप आनंद झाला खरा
! पोटातले कावळे शांत झाल्यावर छान तरतरी आली होती. उजनी धरणाच्या जलाशयाकडे आम्ही
बोटीत बसण्यासाठी निघालो. जाताना वाटेतच काही रंगीबेरंगी सुरेख पक्षी दिसले.
शांत, संथ जलाशयाच्या
पाण्यावर चमचमत्या कोवळ्या सूर्यकिरणांनी चांदण्यांचे तरंग उमटवले होते.
आमची बोट आता फ्लेमिंगोंच्या
दिशेने निघाली होती.
त्याच वाटेवर पाण्यात
शाळा भरल्यासारखे बसलेले 'वारकरी' पक्षी दिसले. काळाभोर रंग आणि कपाळावर टिळा लावलाय
असं वाटणारा छोटा पांढरा ठिपका ! आमची बोट आता फ्लेमिंगोंपासून काही अंतरावर होती.एक
मोठ्ठा फ्लेमिंगोंचा ग्रुप आमच्यापासून सुरक्षित अंतरावर शांतपणे उभा होता. एका पायावर
आपलं छोटंसं शरीर छान तोलून, दुसरा पाय पंखांमध्ये दुमडून घेऊन त्यांची छान विश्रांती
चालली होती. मधूनच त्यांच्यापैकी काहींनी उडण्यासाठी आपले पंख पसरले आणि पंखांचा सुरेख
लाल-केशरी रंग दाखवून आपलं 'अग्निपंख' नाव किती सार्थ आहे, हे दाखवून दिलं ! त्याच
ठिकाणी आम्ही 'चित्रबलाक' (Painted Storks) सुद्धा खूप पाहिले.
सांडपाण्याच्या ठिकाणी
हमखास आपली हजेरी लावणारे 'शेकाटी' (Black Winged Stilt) हे पक्षीही खूप दिसले. 'राखी
बगळा' (Grey Heron), 'वंचक' (Pond Heron) यांनीही आपलं दर्शन घडवलं.
याशिवाय आम्हाला 'खंड्या'
(Kingfisher), 'पिवळा धोबी' (Yello Wagtail), 'टिटवी' (Red-wattled Lap wing) हे सोबती
पण दिसले. चमच्याच्या आकाराची चोच असलेले 'चमचा' (Spoonbilled) मस्त हवेत तरंगत होते.
आता ऊन चांगलंच जाणवायला
लागलं होतं. iCampers च्या Sun Caps ने उन्हाच्या झळांपासून डोकी वाचवली. पोटातल्या
कावळ्यांनी परत एकदा आपलं अस्तित्व दाखवायला सुरवात केली होती.दुपारच्या जेवणाची वेळ
झाली होती. गरम गरम खरपूस चुलीवरची भाकरी, पिठलं आणि डाळ भात असं साधाच पण चवदार बेत
होता. मस्तपैकी तुडुंब जेवून परतीच्या वाटेकडे निघालो.
खूप वेगवेगळे, सुंदर
रंगांचे, रूपाचे पक्षी बघायला मिळाले होते. पण या सगळ्यावर कळस तेव्हा झाला, जेव्हा
आम्हाला 'White Stork' दिसला ! भरतपूरच्या Bird Sanctuary मधेही हा ‘White Stork’ दिसल्याची
गेल्या पंधरा वर्षात नोंद झालेली नाही ! अशा या इतक्या दुर्मिळ असलेल्या पक्ष्याची
एक जोडी भिगवणला आहे असं केदारला कळलं होतं. जलाशयाच्या काठाकाठाने गाडी चालवत, दुर्बीण
तयार ठेवून 'White Stork' कुठे दिसतोय का याचा अगदी बारकाईने केदार शोध घेत होता. बरंच
अंतर उलट्या दिशेने गेल्यावर एका काठावर रुबाबात उभा असलेला 'White Stork' आम्हाला
दिसला ! इतका दुर्मिळ असलेला हा पक्षी त्या दिवसाचा 'हिरो' ठरला असं म्हटलं तरी चालेल
! आमच्या ग्रुपमधल्या अनेक कुशल फोटोग्राफर्सनी अतिशय skillfully त्याचे सुरेख फोटो
घेतले.
भीमा नदीवर बांधलेल्या
उजनी धरणाचा क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्रात पहिला नंबर लागतो. एव्हढी मोठी जलक्षमता
असल्याने या तलावात मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात.
या जलाशयातील उथळ पाणी,
पाण्याबाहेर येणारी दलदलयुक्त बेटं, पाणथळीच्या जागा या सगळ्यामुळे हे पक्ष्यांसाठी अतिशय अनुकूल आणि पोषक असं ठिकाण बनलंय. मुबलक प्रमाणात
उपलब्ध होणारं अन्न आणि घरटी बांधण्यासाठी मिळणारी सुरक्षितता यामुळे फ्लेमिंगों सारखे
परदेशी पाहुणे आणि देशी पक्ष्यांचं हे 'Favorite Destination’ ठरलं आहे. भिगवणचे स्थानिक लोक
या स्थलांतरित पक्ष्यांची आणि इथल्या पर्यावरणाची छान काळजी घेत आहेत.
तिथे येणारे हौशी पक्षीनिरीक्षक
आणि अभ्यासक यांना राहणं, जेवण, गाईड इ. सुविधा पुरवण्याबरोबरच पक्ष्यांच्या सुरक्षिततेची
जबाबदारीही त्यांनी हसतमुखाने पेलली आहे.
दौंड-पाटस फाट्यावर
गाडीने वळण घेतलं. कच्च्या खडबडीत रस्त्यावरून आम्ही 'मयुरेश्वर' ला निघालो होतो. वाटेत
'भीमा सहकारी साखर कारखाना' लागतो.
'मयुरेश्वर' हे एक
अतिशय विरळ आणि खुरटं असं जंगल आहे. चिंकारांना जगण्यासाठी असंच जंगल आवश्यक असतं.
खूप चिंकारा बघितले तिथे. दिसायला अतिशय रुबाबदार, नागमोडी डौलदार शिंगं असलेला 'चिंकारा'
हा हरिणाच्या कुळातला प्राणी मुळातच खूप लाजरा-बुजरा आहे. आमची चाहूल लागून सावध होऊन त्यांनी पळून जाऊ
नये म्हणून गाडीतून खाली न उतरता गाडीच्या खिडकीतूनच त्यांचा मुक्त संचार आम्ही बघितला.
या 'मयुरेश्वर' च्या जंगलात आम्ही सुंदर हिरव्यागार रंगाचे 'वेडा राघू' (Green Bee
Eater) हे पक्षी खूप बघितले.
मयूरेश्वरहून परतताना
सूर्य कलायला लागून तिन्हीसांज झाली होती. मस्त गरम गरम चहाची एक फेरी झाली आणि आम्ही
घराची वाट धरली. मन अजूनही रेंगाळतच होतं भिगवणच्या शांत जलाशयावर. चिंकारांच्या डोळ्यातले
निष्पाप भाव आठवून उगाचच एक हुरहूर लागून राहिली होती.
वाटत होतं, किती मुक्त..स्वच्छंदी...मनस्वी
आहे या चिमुकल्या जीवांचं जगणं !
तसं पाहिलं तर त्यांचं
आयुष्य फारच कमी असतं. पण इतक्या छोट्या आयुष्यातसुद्धा त्यांच्या फक्त असण्यातच आपला
केव्हढा मोठा आनंद सामावलेला असतो !
निसर्गाचं हे सुंदर
रंग आणि रूपाचा साज चढलेलं लेणं आणि त्यांचं कोवळं..निष्पाप..निरागस जग आपलंच जगणं
समृद्ध करून जातं !!
ट्रिप तर मस्तच झाली
होती. कुठलाही पक्षी दिसला की केदार त्याचा इंग्लिश आणि मराठीतलं नाव, त्याची इतर वैशिष्टयं
अशी खूप छान माहिती सांगायचा. त्यामुळे आधीच्या थोड्याशा माहितीमध्ये भर पडत होती.
दिवसभर अनुभवलेल्या खूप सुंदर क्षणांनी ओंजळ भरली होती !
केदार आणि चित्रा..तुम्हा
दोघांना खूप खूप धन्यवाद इतकी छान ट्रिप आखून आम्हाला निसर्गाचं इतकं सुखावून टाकणारं
दर्शन घडवल्याबद्दल !!
|
Indian Robin Female on Sumit's car mirror |
|
Openbill Stork |
|
Bar Header Geese |
|
Whiskered Tern |
|
Grey Heron |
|
River Tern with kill |
|
Pond Heron |
|
Openbill Stork |
|
Garganey Ducks |
|
Great Egret |
|
Painted Storks |
|
Brown Headed Gulls |
|
Greater Flamingo V Formation |
|
Brown Headed Gulls |
|
Painted Storks and Brown Headed Gulls |
|
Grey Heron |
|
Greater Flamingos |
|
Flamingos Landing |
|
Brown Headed Gulls |
|
Painted Storks |
|
Brown Headed Gulls |
|
Flamingos Resting and Painted Storks Flying over them |
|
Pond Heron |
|
Sandpiper which has lost its one leg |
|
Grey Heron got a big kill |
|
Marsh Harrier |
|
Purple Swamphen |
|
Common Kingfisher |
|
Grey Heron and Whiskered Terns |
|
Purple Swapmhens |
|
Ruddy Shelducks |
|
Black Tailed Godwit |
|
Little Ringed Plover |
|
White Stork |
|
White Stork |
|
White Stork in Flight |
|
Baybacked Shrike |
|
Green bee-eater |
|
Indian Bush Lark |
|
Chinkara on Mayreshwar backdrop |
|
Chinkara Male / Indian Gazelle |
|
Birds of a feather flock together |