Monday, 21 January 2019

जावळीच्या जंगलातला वासोटा (अनुभव - सुप्रिया गाडे, सागर कुलकर्णी, अमित देशमुख)


This is combination of 2 blogs from Supriya Gade and Sagar Kulkarni, who were part of the Jan 2019 Vasota trek!! 



कित्येक वर्षांपूर्वी वासोट्याच्या जंगलात तंबू बांधून राहिलो होतो चार दिवस. अगदी स्पष्ट नाही, पण धूसर आठवणी अजूनही आहेत त्या जंगलातल्या रात्रींच्या ! इतक्या वर्षांनंतर पुन्हा वासोट्याला जाण्याचा योग आला तो केदार आणि चित्राच्या iCampers मुळे
वासोट्याचं जंगल पाहिलेलं होतं म्हणून म्हणा किंवा तिथे राहण्याचा अनुभव घेतलेला असल्यामुळे म्हणा..खूप उत्साहात जायचं ठरवलं आणि पैसे भरले.
मन अतिशय द्विधा मनस्थितीमध्ये होतं. एक मन म्हणत होतं, नाही झेपणार आपल्याला. नको जायला. त्याच वेळी दुसरं मन मात्र वासोट्याचं दाट जंगल आठवून उत्साह दाखवत होतं. कच खाणाऱ्या मनाला खूप प्रयत्नाने तयार केलं आणि जायचं नक्की झालं. रविवारी पहाटे चार वाजता 'समुद्र' जवळ जमायचं ठरलं होतं. अडीच वाजताचा गजर लावला होता.इतक्या पहाटे 'समुद्र' च्या इथे चहा आणि ब्रेकफास्ट साठी झालेली गर्दी बघून वाटलं, खरंच..पुणं खूप बदललंय ! जवळपास पंचवीस जणांची आमची गॅंग होती. साडेचारच्या सुमारास निघालो.
खूपच लवकर उठल्यामुळे गाडीत बसल्यावर थोड्याच वेळात अपूर्ण झालेली झोप डोळ्यावर आपोआपच दिसायला लागली. तांबडं फुटायला लागलं. गाडीने बामणोलीचा रस्ता धरला. 'कास' पठाराच्या रस्त्यावर छोटे छोटे टुमदार रिसॉर्ट्स लक्ष वेधून घेत होते. सप्टेंबर महिन्यात रंगीबेरंगी फुलांचे गालिचे अंगावर मिरवणारं 'कास' पठार आज मात्र ओसाड माळरानच दिसत होतं. जणू वाट बघत होतं..त्या येऊ घातलेल्या बहराची !
सुबक..शांत आणि छोट्याश्या सातारा शहरातून बामणोलीला पोहोचलो. कांदेपोहे आणि चहा हा All Time Favourite ब्रेकफास्ट केला.  पोटातले कावळे आता शांत झाले होते आणि मस्त तरतरी आली होती.

मनातल्या मनात एकीकडे "आपल्याला वासोटा किल्ला पायथ्यापासून वरपर्यंत चढून जायचंय" अशी तयारी करणंही सुरु होतं. कोयना धरणाच्या बॅकवॉटर च्या 'शिव सागर' जलाशयातून बोटीतून प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जावं लागतं. वन खात्याच्या परवानगीचे सोपस्कार पार पाडून आम्ही दोन बोटींमधून आमच्या किल्ल्याच्या प्रवासाचा शुभारंभ केला. थंडीचे दिवस असल्यामुळे हवेत छान फ्रेशनेस होता.  'शिव सागर' च्या शांत..विस्तीर्ण जलाशयातून बोट चालली होती. जवळजवळ दिड ते पावणेदोन तासांचा बोटीतून प्रवास करायचा होता. जलाशयाच्या बाजूने वासोट्याचं घनदाट जंगल दिसत होतं. मधूनच एखादा पक्षी पाण्यातल्या आपल्या सावजावर डोळा ठेवून सूर मारताना दिसत होता. 'शिव सागर' च्या शांत..विस्तीर्ण जलाशयातून बोट चालली होती. जवळजवळ दिड ते पावणेदोन तासांचा बोटीतून प्रवास करायचा होता. जलाशयाच्या बाजूने वासोट्याचं घनदाट जंगल दिसत होतं. मधूनच एखादा पक्षी पाण्यातल्या आपल्या सावजावर डोळा ठेवून सूर मारताना दिसत होता.

आता बोटीतून किल्ला नजरेच्या टप्प्यात आला होता. मन म्हणत होतं.."आपल्याला तिथे..त्या किल्ल्यावर जायचंय ! इतक्या उंच..इतक्या लांब !

बोटीचा प्रवास संपवून आम्ही आता किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोहोचलो होतो. चालायला सुरुवात करण्यापूर्वी एक Introduction Round झाली. इतका वेळ एकत्र प्रवास करत होतो, पण कोणाला कुणाची नावंही माहित नव्हती. आता ओळखी झाल्यावर चालण्याचा हुरूप नक्कीच वाढला होता. रविवारच्या सुट्टीमुळे गडावर जाण्याच्या वाटेवर तोबा गर्दी होती. सांगली, मिरज अशा लांबच्या ठिकाणांवरून ट्रेकर्सचे ग्रुप्स आले होते.
पाठीवरच्या सॅकचं ओझं सांभाळत आणि अर्थात स्वतःलाही सांभाळत आम्ही आता गड चढायला सुरुवात केली. साधारण एक किलोमीटर अंतर पार केल्यावर गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथे एक छोटंसं देऊळ आहे. गणरायाची आणि हनुमानाची मूर्ती आहे. डोळे मिटून हात जोडले. चालण्यासाठी आणि सुखरूप परत येण्यासाठी बळ मिळालं.  या मंदिराजवळ 'वासोटा किल्ल्याकडे- किमी' असं लिहिलेली
पाटी होती
आता खरी कसोटी होती ! एक तर इतक्या अवघड वाटेवरून..चढणीवरून चालायची सवयच नसते पायांना. जिम मध्ये ट्रेड मिलवर आणि तळजाईच्या सरळ वाटेवर चालणारे आपले पाय !  
उत्साहात चढायला सुरुवात केली खरी...पण जरासा अंतर पार केलं की वाटायचं..केव्हढं चाललो आपण !
अजून किती वेळ चालायचंय ! पार्थ आणि नेहा आमच्या गॅंगमधले छोटे दोस्त होते. त्यांचा उत्साह बघून उभारी मिळायची. अजय काळे सर आणि विनया मॅडम आमच्यापेक्षा बरेच सिनियर असूनही निग्रहाने चालत होते. त्यांची इच्छाशक्ती प्रेरणा देत होती प्रत्येक पाऊल टाकताना.
खरं तर पायथ्यापासून गडापर्यंतचं अंतर फार जास्त नव्हतं...पण चढण इतकी अवघड होती..की खूप जास्त अंतर आहे असं वाटत होतं. पायवाटेवरून चढताना दोन्ही बाजूला असलेलं घनगर्द जंगल सोबत करत होतं. माणसांची प्रचंड गर्दी होती, त्यामुळे जंगलातले वन्य प्राणी दर्शन देतील ही शक्यता तिळमात्रही नव्हती. दाट झाडांमुळे हवेत छान गारवा होता.प्रत्येक पाऊल कसोटी पाहत होतं आपल्या आतल्या शक्तीची...
फायनली आम्ही गडावर पोहोचलो. मागे वळून पाहिल्यावर स्वतःचीच कॉलर ताठ होत होती. खूप
काहीतरी ग्रेट केल्याचं फिलिंग येत होतं ! 'शिव सागर' जलाशय आणि त्याभोवती अथांग पसरलेलं जंगल हा नजारा गडावरून पाहिल्यानंतर आत्तापर्यंत केलेले कष्ट सार्थकी लागले असं वाटत होतं !
आमच्या गॅंगमधले काही जण आमच्या बरंच आधी पोहोचून छानपैकी झाडाखाली विश्रांती घेत होते. गडाच्या माथ्यावरून 'शिव सागर' जलाशय चंदेरी ठिपका वाटत होता. एव्हढे कष्ट घेऊन गडावर पोहोचल्यावर झालेलं सहभोजन अवीट गोडीचं होतं ! आपली रोजची साधी पोळी भाजीच होती, पण तिची चव कायम लक्षात राहण्यासारखी !

पोटभर जेवल्यावर गडावर मस्त रपेट मारली. केदार खूप छान माहिती देत होता.
शिवाजी महाराजांनी जावळीचं खोरं जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले ताब्यात घेतले.
पण वासोटा हा अतिशय दुर्गम भागात असल्यानं आणि चहुबाजूंनी दाट जंगल असल्यानं त्यांनाही इथे किल्ला आहे हे समजायला वेळ लागला होता ! 

शिवाजी महाराजांनी ..१६५५ मध्ये जेव्हा जावळीचं खोरं जिंकलं, तेव्हा वासोटा किल्ल्याचा स्वराज्यामध्ये समावेश केला. राजांनी या गडाचं 'व्याघ्रगड' असं नामकरण केलं. ('व्याघ्र' म्हणजे 'वाघ')
सिद्दी जोहरने जेव्हा पन्हाळ्यावर आक्रमण केलं होतं,तेव्हा ब्रिटिशांनी त्याच्याकडे वासोट्यावर हल्ला करण्यासाठी तोफा दिल्या होत्या. याच कारणासाठी पन्हाळ्यावरुन सुटल्यानंतर शिवाजी महाराजांनी राजापूरवर हल्ला करून ब्रिटिशांना ताब्यात घेतलं. या ब्रिटिश कैद्यांना अडीच वर्ष वासोट्यावर कैदी म्हणून ठेवलं होतं ! इतिहासामध्ये खूपच कमी घटना अशा आहेत, जिथे या किल्ल्याचा उल्लेख आढळून येतो. या ब्रिटिश कैद्यांची नावं होती.. Henry Revington, Richard Taylor, Philip Gyffard. 

निसर्गाचं अंगावर काटा आणणारं रौद्र रूप म्हणजे 'बाबू कडा' !
तिथून नजर वर गेल्यावर 'जुना वासोटा' दिसतो. या जुन्या वासोट्यावर जंगली श्वापदं असल्यामुळे फारशी माणसांची ये जा नसते. तसंच इथे जाण्याची वाटही तितकी सोपी नाही.  
जुना वासोटा बघून परत आलो. 'नागफणी' चा डोंगर पाहिला. गडावरून दिसणारं हिरवागार जावळीचं खोरं..सह्याद्रीच्या लांबवर पसरलेल्या डोंगर रांगा..हा देखावा कुठल्याही मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये किंवा लेन्स मध्ये मावणारा ! निसर्गाने आपल्याला दिलेल्या दोनच डोळ्यांमध्ये किती साठवू आणि किती नको असं होऊन गेलं होतं. हे क्षण आम्ही फक्त जगत होतो आणि या आठवणी मनात साठवून ठेवत होतो ! वन खात्याच्या नियमानुसार जास्तीत जास्त संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गडावरून परतायला हवं होतं.
एव्हाना पाय चांगलेच बोलायला लागले होते.  

आता गड उतरायला सुरवात केली.
पाय इतके दुखत होते...की अक्षरशः कुणीतरी आता आपल्याला उचलून नेलं तर फार बरं होईल असं वाटत होतं. उतरतानाची परीक्षा वेगळीच होती. कच्ची माती, दगड गोटे आणि अतिशय घसरडी पायवाट.
मला तर उतरताना चार -पाच वेळा 'दुर्ग प्रसाद' मिळाला ! शरीराचा सगळा भार गुढघ्यांवर येत होता.
वाटत होतं..आपण तर एवढं चढलो पण नव्हतो ! मग का संपता संपता नाहीये ही वाट ?
नजरेच्या टप्प्यात 'शिव सागर' आला. एकेक करून सगळे खाली पोहोचल्यावर मस्तपैकी मिसळ-पाव आणि चहा असा बेत होता.

दुखणारे पाय..थकलेलं शरीर आणि मनातलं अतीव समाधान अशा संमिश्र भावना घेऊन गाडीत बसलो.
आता फक्त समोर घर दिसत होतं. चालून चालून आलेल्या थकव्याने सगळ्यांचेच डोळे मिटायला लागले आणि थोड्याच वेळात आम्ही झोपेच्या अधीन झालो.

मनात येत होतं...वासोट्यासारखा चढायला इतका अवघड गड आपण चढून गेलो आणि सुखरूप घरी पोहोचलो हा स्वतःवर...स्वतःच्या इच्छा शक्तीवर मिळवलेला विजय होता !
It’s not mountain to conquer…but its ourselves!!!

दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टीच टाकली होती. पुन्हा नव्याने रुटीन सुरु करण्यासाठी भरपूर एनर्जी...
नवी उमेद आणि अर्थातच एक वेगळंच समाधान मिळालं होतं !
शिवरायांच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या सह्याद्रीच्या कुशीत आपण जन्म घेतला याचा अभिमानही वाटत होता ! 

 
-- सुप्रिया गाडे


वासोटा ट्रेक-एक अविस्मरणीय प्रवास

वासोटा ट्रेक हा माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव होता,कारण अशा एखाद्या official ट्रेक वर मी पहिल्यांदा चाललो होतो. वासोटा किल्ल्याबद्दल सांगायचे झाले तर त्या बद्दल मला काही जास्त माहिती नव्हती, पण मित्रांशी बोलताना त्याचा विषय निघत असे. त्या मुळे मी या प्रवासाबद्दल खूपच excited होतो.
 13 January ला आम्ही निघणार होतो. त्या रात्री मला मुळात झोपच लागली नाही. कारण ट्रेक ला जाण्याची उत्कंठा शिगेला होती.  मग ठरलेल्या वेळे नुसार आम्ही 4.00 वाजता साताऱ्याकडे जाण्यास निघालो. हवेमध्ये गारवा मोठया प्रमाणात जाणवत होता. त्या मुळे सर्वजण अगदी शांतपणे बसून होते. पहाटेच निघाल्यामुळे रस्त्यावर वाहतूक हि काही नव्हती.

ठीक 7.00 वाजता आम्ही साताऱ्यात पोहोचलो. आत्ता बाहेर  चांगलच उजेडल होत. वातावरण अगदी प्रसन्न वाटत होते. रस्त्यावर morning walk  ला आलेल्या लोकांची वर्दळ दिसत होती.. तिथून मग आम्ही बामणोली कडे जाण्यास निघालो. बामणोली हे गाव तेथून जवळपास 35किमी अंतरावर होते. ती नागमोडी वळणे, आजूबाजूला हिरवीगार झाडी, चढ-उतार हे सर्व  अगदी मनाला भावून टाकत होते. अशातच सूर्यनारायनाचे दर्शन झाले. त्याची ती लालसर कोवळी किरणे  झाडांवर पडल्यामुळे त्यांना एक प्रकारची झळाळी आली हाती. त्या मुळे निसर्गाच्या सुंदरतेत आणखीनच भर पडली होती. आता हवेतील गारवा थोड्या प्रमाणात कमी झाला होता.

तब्बल एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही बामणोली बोट केंद्रावर पोहोचलो. रविवार असल्यामुळे त्या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात होती. अनेक कॉलेजच्या तरुण-तरुणी त्या ठिकाणी आले होते. हे पाहून बरे वाटले की आज ही युवा पिढी मध्ये  ऐतिहासिक  वास्तुबद्दलची ओढ कायम आहे. तिथे आल्यानंतर मग आता पोटात कावळे ओरडत होते. मग त्या ठिकाणी आम्ही सर्वानी कांदे पोह्यांचा आस्वाद घेतला. चहा हि झाला. त्या मुळे आता अंगात थोडी ताकत आली होती. त्या ठिकाणी मग कॅम्प मधील लोकांशी सर्वांची ओळख झाली. त्या ठिकाणी असलेल्या जलाशय  समोर सर्वानी एक ग्रुप फोटो काढले,नंतर मग बोटीची घोषणा झाल्यावर आम्ही सर्वजण पुढील प्रवासाला निघालो.

हा बोटीतील प्रवास खूपच आल्हाददायक होता. केदार सर यांनी सांगितले की यो जलाशय म्हणजे कोयना धरणाचे बॅक वॉटर आहे. बोटीतून आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसत होता. आजूबाजूला हिरवेगार डोंगर, निळेशार पाणी आणि त्यावर पडलेली सूर्याची किरणे यामुळे वातावरण अगदी प्रफुल्लित झाले होते.
 मधेच पक्ष्याचा थवा उडताना दिसत होता. बोटी मध्ये मग सर्वांच्या गप्पा रंगल्या होत्या. मधेच केदार सर सर्वांना तेथील पक्ष्याची माहिती देत होते की, कसे काही पक्षी एका ध्रुवाहून दुसऱ्या ध्रुवाकडे प्रवास करतात. अशाच गप्पामध्ये आम्ही तब्बल 1.३० तास प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो.  तेथूनच आमचा  प्रवास सुरु झाला. मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली होती, कि आज काही तरी नवीन करायला मिळणार. त्यानुसार आमचा बरोबर 11.00 वाजता गडाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. आता सर्वजण आपापल्या वेगाने निघाले. त्या ठिकाणी एक पाऊलवाट जात होती .आजूबाजूला दाट जंगल  आणि मधेच ती पाऊल वाट खूपच छान दिसत होती. थोडे दूर चालल्यानंतर  त्या ठिकाणी एक झरा वाहत होता. ते दृश्य खूपच आल्हाददायक वाटत होते. मधूनच सूर्याचा एखादा किरण त्या झाडामधून हळूच डोकावत होता. ते चित्र मनाला खूपच भावुक करून टाकत होते. असेच अनेक गोष्टी बघत अनेक चढ उतार पार करत आम्ही एकदाशी किल्ल्याच्या टोकाला पोहोचलो.तब्बल 2 तास प्रवास करून आम्ही 1वाजता किल्ल्यावर गेलो.

वरून जे पहिले ते फारच अविस्मरणीय होते.ती दाट झाडी, तो जलाशय अतिशय  अद्भुत दिसत होते,. किल्ला चढून वर गेल्यामुळे  आता थोडासा थकवा जाणवत होतो, म्हणून सर्वजण एका झाडा खाली बसलो. त्या ठिकाणी आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर किल्ल्या वर इकडे तिकडे फिरलो, सर्वानी आपापल्या प्रिय माणसाबरोबर फोटो घेतले, नंतर केदार सरांनी आम्हाला किल्ल्या विषयी सांगितले, कि कसा हा किल्ला शिवाजी महाराजांनी मिळवला, अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या, फारच जुना व अतिशय दाट जंगलात असल्यामुळे किल्ल्यावर फक्त अवशेषच उरले होते, सगळी पडझड झाली होती, परंतु एक गोष्ट म्हणजे, आजही मराठी स्वराज्याचा भगवा झेंडा ताठ मानेने त्या ठिकाणी उभा होता, व असेच सर्वानी ताठ मानेने जगण्याचा  संदेश तो देत होता. मग थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.बरोबर 4.30 वाजता आम्ही पुन्हा पायथ्याला पोहोचलो.
अश्याप्रकारे हा सर्व प्रवास व्यवस्थित पार पडला. नंतर आम्ही पुन्हा बोटीने बामणोली केंद्राकडे आलो.तिथे चहा पाणी करून आम्ही परतीला लागलो.गाडी मध्ये बसल्यानंतर दिवसभराचा चित्रपट डोळ्यासमोर येत होता. ते घनदाट झाडी, ती पायवाट, ते निळेशार पाणी,तो पक्ष्याचा थवा, हिरवेगार डोंगर ,नागमोडी वळणे या सर्व गोष्टी आठवल्या. Thanks to iCampers team for arranging this adventurous trek.



-- सागर कुलकर्णी



विस वर्ष ज्या ट्रेकची वाट पाहिली तो दिवस आज आला. पहाटे चार वाजता फुल एकसाईटमेंटमधे निघालो सुद्धा. गडाच्या पायथ्याशी पोहोचायला दोन तासांची बोट राईड होती. पूर्वी नौदल लढाईला जायचे तसे पंचवीस तीस बोटी एकदम गडाच्या दिशेने निघाल्या, कोयनेच्या विस्तीर्ण जलाशयातून नागमोडी वाटेने शांतपणे पुढे पुढे..... एक तासभर नंतर जेव्हा वासोटाचे पहिल्यांदा दर्शन झाले तेव्हा कळले आज कसोटी आहे .....

गड चढताना सुरुवातीला उत्साह होता ... पण... गड काही संपेना.... मग एकमेकांना सांगायला सुरुवात..... हा काय ....आजून फक्त 10 मिनिटं.... शेवटी एकमेकांना पुढे ढकलत जेव्हां गडावर पोहोचलो तेव्हा खाली पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.... सकाळ पासूनच्या कष्टांचे सार्थक झाले.... ऐसेमे एक सेल्फी तो बनता है ।।
आणलेला डबा कसा कधी संपला कळलेच नाही.... गडावर फोटोशूट झाल की फुल पैसा वसूल...

रविवार असल्याने उतरताना जत्रे सारखी गर्दी होती.... बोटीतून परतताना संध्याकाळचा मंद सूर्यास्त, शांत पाणी, थंड हवा, दिवसभराच्या आठवणी आणि मागे दूर जात दिसणारा वासोटा........

-- अमित देशमुख


Photos by - Kedar Kulkarni, Tushar Mishra, Sagar Kulkarni -


























Thursday, 27 December 2018

Bhigwan-16th December 2018 - Author - Supriya Gade


दरवर्षी डिसेंबर महिना आला की पेपरमध्ये फ्रंट पेज ला मोठी बातमी असायची, 'हिवाळा सुरु झाल्यामुळे फ्लेमिंगो (रोहित) पक्षी उजनीच्या जलाशयावर मोठ्या संख्येने आले आहेत.' ही बातमी वाचली आणि फ्लेमिंगोंचे सुंदर रंगीत फोटो पाहिले, की मनाच्या एका कोपर्यात दबा धरून असलेली भिगवणला जाण्याची इच्छा उसळी मारून वर यायची !
अशातच २४ नोव्हेंबरला whats app वर भिगवण आणि मयुरेश्वरची ट्रिप आखल्याचा केदारचा मेसेज आला आणि अगदी लगेचच त्याला माझं भिगवणचं नक्की असल्याचा रिप्लाय केला.

१६ डिसेंबर तारीख ठरली होती. जाण्याचा दिवस जसजसा जवळ येत होता, तसतशी excitement वाढत होती. खूप उत्साहात दुर्बिणीची खरेदी झाली.

एरवी डिसेंबर महिन्यातल्या थंडीतल्या रविवारची सुट्टी म्हटलं की लवकर वगैरे उठण्याचे विचार मनाच्या आसपाससुद्धा फिरकत नाहीत. पण त्या दिवशीचा लवकर उठण्याचा उत्साह काहीसा वेगळाच होता. त्याच उत्साहात स्वारगेटहून पहाटे साडेपाच वाजता निघालो.

गाडीत बसल्यावर जरावेळ डुलकी लागली, पण थोडा वेळ गेला आणि खिडकीच्या काचेतून दिसणारी हिरवीगार शेतं बघून मन ताजंतवानं झालं. मधूनच एखादा बळीराजा त्याच्या सर्जा-राजाच्या जोडीच्या मदतीने काळ्या आईची मशागत करत होता.छोट्या छोट्या टुमदार बैठ्या घरांच्या अंगणात कोंबड्या आणि त्यांची पिल्लं बागडत होती. सातच्या सुमारास भिगवणपासून साधारण ४ ते ५ किमी अंतरावर असलेल्या 'कुंभारगाव' इथे पोहोचलो. एव्हाना पोटातले कावळे चांगलेच जागे झाले होते. ब्रेकफास्टसाठी मस्तपैकी कांदे-पोहे आणि गरम गरम चहा असा आवडता मेनू होता. कांदे-पोह्याचा मनापासून आस्वाद घेताना बाजूच्या कठड्यावर आपल्या रोजच्या जगण्यातून आता गायब झालेल्या चिऊताई खूप दिसल्या. साधी इवलीशी चिमणी दिसल्यावर आनंद होणारं वय केव्हाच सरलंय आता. पण खूप आनंद झाला खरा ! पोटातले कावळे शांत झाल्यावर छान तरतरी आली होती. उजनी धरणाच्या जलाशयाकडे आम्ही बोटीत बसण्यासाठी निघालो. जाताना वाटेतच काही रंगीबेरंगी सुरेख पक्षी दिसले.

शांत, संथ जलाशयाच्या पाण्यावर चमचमत्या कोवळ्या सूर्यकिरणांनी चांदण्यांचे तरंग उमटवले होते.
आमची बोट आता फ्लेमिंगोंच्या दिशेने निघाली होती.

त्याच वाटेवर पाण्यात शाळा भरल्यासारखे बसलेले 'वारकरी' पक्षी दिसले. काळाभोर रंग आणि कपाळावर टिळा लावलाय असं वाटणारा छोटा पांढरा ठिपका ! आमची बोट आता फ्लेमिंगोंपासून काही अंतरावर होती.एक मोठ्ठा फ्लेमिंगोंचा ग्रुप आमच्यापासून सुरक्षित अंतरावर शांतपणे उभा होता. एका पायावर आपलं छोटंसं शरीर छान तोलून, दुसरा पाय पंखांमध्ये दुमडून घेऊन त्यांची छान विश्रांती चालली होती. मधूनच त्यांच्यापैकी काहींनी उडण्यासाठी आपले पंख पसरले आणि पंखांचा सुरेख लाल-केशरी रंग दाखवून आपलं 'अग्निपंख' नाव किती सार्थ आहे, हे दाखवून दिलं ! त्याच ठिकाणी आम्ही 'चित्रबलाक' (Painted Storks) सुद्धा खूप पाहिले.

सांडपाण्याच्या ठिकाणी हमखास आपली हजेरी लावणारे 'शेकाटी' (Black Winged Stilt) हे पक्षीही खूप दिसले. 'राखी बगळा' (Grey Heron), 'वंचक' (Pond Heron) यांनीही आपलं दर्शन घडवलं.
याशिवाय आम्हाला 'खंड्या' (Kingfisher), 'पिवळा धोबी' (Yello Wagtail), 'टिटवी' (Red-wattled Lap wing) हे सोबती पण दिसले. चमच्याच्या आकाराची चोच असलेले 'चमचा' (Spoonbilled) मस्त हवेत तरंगत होते.

आता ऊन चांगलंच जाणवायला लागलं होतं. iCampers च्या Sun Caps ने उन्हाच्या झळांपासून डोकी वाचवली. पोटातल्या कावळ्यांनी परत एकदा आपलं अस्तित्व दाखवायला सुरवात केली होती.दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. गरम गरम खरपूस चुलीवरची भाकरी, पिठलं आणि डाळ भात असं साधाच पण चवदार बेत होता. मस्तपैकी तुडुंब जेवून परतीच्या वाटेकडे निघालो.
खूप वेगवेगळे, सुंदर रंगांचे, रूपाचे पक्षी बघायला मिळाले होते. पण या सगळ्यावर कळस तेव्हा झाला, जेव्हा आम्हाला 'White Stork' दिसला ! भरतपूरच्या Bird Sanctuary मधेही हा ‘White Stork’ दिसल्याची गेल्या पंधरा वर्षात नोंद झालेली नाही ! अशा या इतक्या दुर्मिळ असलेल्या पक्ष्याची एक जोडी भिगवणला आहे असं केदारला कळलं होतं. जलाशयाच्या काठाकाठाने गाडी चालवत, दुर्बीण तयार ठेवून 'White Stork' कुठे दिसतोय का याचा अगदी बारकाईने केदार शोध घेत होता. बरंच अंतर उलट्या दिशेने गेल्यावर एका काठावर रुबाबात उभा असलेला 'White Stork' आम्हाला दिसला ! इतका दुर्मिळ असलेला हा पक्षी त्या दिवसाचा 'हिरो' ठरला असं म्हटलं तरी चालेल ! आमच्या ग्रुपमधल्या अनेक कुशल फोटोग्राफर्सनी अतिशय skillfully त्याचे सुरेख फोटो घेतले.
भीमा नदीवर बांधलेल्या उजनी धरणाचा क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्रात पहिला नंबर लागतो. एव्हढी मोठी जलक्षमता असल्याने या तलावात मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात.
या जलाशयातील उथळ पाणी, पाण्याबाहेर येणारी दलदलयुक्त बेटं, पाणथळीच्या जागा या सगळ्यामुळे हे पक्ष्यांसाठी  अतिशय अनुकूल आणि पोषक असं ठिकाण बनलंय. मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारं अन्न आणि घरटी बांधण्यासाठी मिळणारी सुरक्षितता यामुळे फ्लेमिंगों सारखे परदेशी पाहुणे आणि देशी पक्ष्यांचं हे 'Favorite Destination’ ठरलं आहे. भिगवणचे स्थानिक लोक या स्थलांतरित पक्ष्यांची आणि इथल्या पर्यावरणाची छान काळजी घेत आहेत.
तिथे येणारे हौशी पक्षीनिरीक्षक आणि अभ्यासक यांना राहणं, जेवण, गाईड इ. सुविधा पुरवण्याबरोबरच पक्ष्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही त्यांनी हसतमुखाने पेलली आहे.
दौंड-पाटस फाट्यावर गाडीने वळण घेतलं. कच्च्या खडबडीत रस्त्यावरून आम्ही 'मयुरेश्वर' ला निघालो होतो. वाटेत 'भीमा सहकारी साखर कारखाना' लागतो.

'मयुरेश्वर' हे एक अतिशय विरळ आणि खुरटं असं जंगल आहे. चिंकारांना जगण्यासाठी असंच जंगल आवश्यक असतं. खूप चिंकारा बघितले तिथे. दिसायला अतिशय रुबाबदार, नागमोडी डौलदार शिंगं असलेला 'चिंकारा' हा हरिणाच्या कुळातला प्राणी मुळातच खूप लाजरा-बुजरा आहे. आमची चाहूल लागून सावध होऊन त्यांनी पळून जाऊ नये म्हणून गाडीतून खाली न उतरता गाडीच्या खिडकीतूनच त्यांचा मुक्त संचार आम्ही बघितला. या 'मयुरेश्वर' च्या जंगलात आम्ही सुंदर हिरव्यागार रंगाचे 'वेडा राघू' (Green Bee Eater) हे पक्षी खूप बघितले.

मयूरेश्वरहून परतताना सूर्य कलायला लागून तिन्हीसांज झाली होती. मस्त गरम गरम चहाची एक फेरी झाली आणि आम्ही घराची वाट धरली. मन अजूनही रेंगाळतच होतं भिगवणच्या शांत जलाशयावर. चिंकारांच्या डोळ्यातले निष्पाप भाव आठवून उगाचच एक हुरहूर लागून राहिली होती.
वाटत होतं, किती मुक्त..स्वच्छंदी...मनस्वी आहे या चिमुकल्या जीवांचं जगणं !
तसं पाहिलं तर त्यांचं आयुष्य फारच कमी असतं. पण इतक्या छोट्या आयुष्यातसुद्धा त्यांच्या फक्त असण्यातच आपला केव्हढा मोठा आनंद सामावलेला असतो !

निसर्गाचं हे सुंदर रंग आणि रूपाचा साज चढलेलं लेणं आणि त्यांचं कोवळं..निष्पाप..निरागस जग आपलंच जगणं समृद्ध करून जातं !!

ट्रिप तर मस्तच झाली होती. कुठलाही पक्षी दिसला की केदार त्याचा इंग्लिश आणि मराठीतलं नाव, त्याची इतर वैशिष्टयं अशी खूप छान माहिती सांगायचा. त्यामुळे आधीच्या थोड्याशा माहितीमध्ये भर पडत होती. दिवसभर अनुभवलेल्या खूप सुंदर क्षणांनी ओंजळ भरली होती !

केदार आणि चित्रा..तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद इतकी छान ट्रिप आखून आम्हाला निसर्गाचं इतकं सुखावून टाकणारं दर्शन घडवल्याबद्दल !!


Indian Robin Female on Sumit's car mirror

Openbill Stork

Bar Header Geese

Whiskered Tern

Grey Heron

River Tern with kill

Pond Heron

Openbill Stork

Garganey Ducks

Great Egret

Painted Storks

Brown Headed Gulls

Greater Flamingo V Formation

Brown Headed Gulls

Painted Storks and Brown Headed Gulls

Grey Heron

Greater Flamingos

Flamingos Landing

Brown Headed Gulls

Painted Storks

Brown Headed Gulls

Flamingos Resting and Painted Storks Flying over them

Pond Heron

Sandpiper which has lost its one leg

Grey Heron got a big kill

Marsh Harrier

Purple Swamphen

Common Kingfisher

Grey Heron and Whiskered Terns

Purple Swapmhens

Ruddy Shelducks

Black Tailed Godwit

Little Ringed Plover

White Stork

White Stork

White Stork in Flight

Baybacked Shrike

Green bee-eater

Indian Bush Lark

Chinkara on Mayreshwar backdrop

Chinkara Male / Indian Gazelle



Birds of a feather flock together