Showing posts with label Fregervariyar species. Show all posts
Showing posts with label Fregervariyar species. Show all posts

Wednesday, 24 August 2016

आंबोली... - जुलै २०१६ - कॅम्प २५ (लेखक - मनीषा शेट्टी)

आंबोली...


महाराष्ट्राचं चेरापुंजी..
Hotspot in Biodiversity.. 
सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेलं एक हिलस्टेशन..
उंचच उंच वृक्ष, खळाळते धबधबे यांनी सजलेलं, नटलेलं वर्षावन..
       अशा एक ना अनेक विशेषणांनी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीला मी आत्तापर्यंत कधीही गेले नव्हते पण जेव्हा गेले तेव्हा मात्र या सर्व विशेषणात माझ्यातर्फे आणखीन भरच पडली....
ज्यांना चिंब भिजवणाऱ्या पावसात मनसोक्त भटकायला, ट्रेकिंग करायला आवडतं त्यांच्यासाठी; अगदी नियमित वारी करावी अशी पंढरी म्हणजे आंबोली...
आणि ज्यांना फोटोग्राफी प्रचंड आवडते त्यांच्या साठी विशेषतः मॅक्रो फोटोग्राफर्स साठी नंदनवन म्हणजे आंबोली...
कारण पावसाळ्यात आंबोलीतील प्रत्येक अणुरेणूच जणू जिवंत होतो. झाडापानांवरच नाही तर गळून पडलेल्या पानांखाली, कुजलेल्या ओंडक्याखाली किंवा अगदी खडकांच्या सांदरकपारीतही जिथे पहाल तिथे कोणता ना कोणता जीव श्वास घेत असतो.. असंख्य नमुण्यांचे कीटक, सर्प, उभयचर प्राणी, पक्षी, फुलपाखरं, गोगलगायी, जळू, अळ्या, अंडी, tadpole अशी जगण्याची अनेकविध रूपं पाहायला मिळतात...अनुभवायला मिळतात... असं वाटतं की जणू पानापानांतून टपटपणाऱ्या पागोळ्यांतुन जीवनच ठिबकतंय.. बहरतंय...

     अशीच पावसाळ्यातली आंबोली अनुभवायला आमचा १९ जणांचा iCampers चा चमू शनिवारी दुपारी १ वाजता तिथे पोहोचला. तिथं पर्यंत जाण्याचा रस्ताच इतका सुंदर आहे की प्रवासाचा शीण अजिबात जाणवत देखील नाही... क्षितिजापार नजर जाईस्तोवर हिरवाई... झाडेही जणु मॉस चा हिरवा स्वेटर घालून बसलेली आणि ते कमी कि काय म्हणून अधून मधून धुक्याची शुभ्र दुलईही लपेटून घ्यायची..  मधूनच कधी भुरभुर, कधी टपटप, कधी सरसर तर कधी धोधो पावसाची हजेरी... सगळंच  अगदी स्वप्नवत...  आपण खूप आनंदी असलो तर "I am on Cloud 9..." अशी जी म्हणायची पद्धत आहे ना ती आम्ही अक्षरशः अनुभवत होतो..

     हवेतील मंदमंदसा गारवा आणि ४-५ तासांचा प्रवास यांनी भूक पण झपाटून लागली होती त्यामुळं सर्वात आधी जेवणाकडे मोर्चा वळला. पोळी भाजी बरोबरच गरमागरम वाफाळलेला भात, खोबऱ्याच वाटण लावलेलं फोडणीचं वरण, तळलेला पापड, लोणचं आणि कोकणी स्पेशल सोलकढी यावर मनसोक्त ताव मारला. खालचा  फोटो पाहून हे कळेलच की लोकांनी कशी बोटं सुद्धा चाटून पुसून खाल्ली...
   


J1
 
       जेवण करून ताजंतवानं झाल्यावर आता वेध लागले होते भटकंतीचे..  सगळ्यांच्या मनात Jungle Trail बद्दल जितकी उत्सुकता होती तेवढीच किंबहुना थोडी जादाच भीती जळवांच्या बद्दल होती आणि पाऊस तर संततधार सुरूच होता त्यामुळे त्या दोहोंचा पुरता बंदोबस्त करून आम्ही पहिल्या ट्रेल ला निघालो. गाईड म्हणून तिथले अनुभवी काका भिसे सोबतीला होतेच.     
 
Here we start! Sharp shooters.. On the move..
           
झिरमिर पाऊस.. मनां मनांतला .. 

Sachin and Meha


     सर्व प्रथम आंबोली बुश या फ्रॉग ची अंडी पाहायला मिळाली. ती इतकी सुंदर दिसत होती की सुबकपणे मांडलेली मोत्यांची आरासच जणू. त्या पारदर्शी अंड्यातून वेगवेगळ्या स्टेजेस मधली बेडकाची चिल्ली पिल्ली  पाहणं म्हणजे खरोखर एक पर्वणीच होती. जरा पुढे गेलो तर अनेक टॅडपोल्स पोहण्याचा सराव करण्यात गुंग होते. जसजसे पुढे जाऊ तसतसे आंबोली बुश फ्रॉग, ट्रायकलर फ्रॉग, गार्डन लिझार्ड, कॅटरपिलर, गोगलगाय  आणि हो ज्यांची सगळ्यात जास्त भीती होती त्या जळू पण दिसल्या पण सुदैवाने कोणालाही त्या लागल्या नाहीत. बरं या सगळ्या दिसणाऱ्या मंडळींना आम्हाला नुसते डोळ्यात साठवायचे नव्हते तर कॅमेऱ्यात कैद ही करायचे होते. त्यामुळे होणारी तारांबळ तर अगदी पाहण्याजोगी होती.

     नुसती कल्पना करून पहा... वरुन सतत पडणारा पाऊस, खाली एकतर शेवाळलेला, निसरडा रस्ता  किंवा चिखलाने माखलेली पायवाट, त्यांवरही कुजक्या पानांचा जाडसर थर, अंगावर रेनकोट किंवा पॉन्चो, एका हातात कॅमेरा अन एका हातात छत्री, आणि पावसापासून कॅमेऱ्याला वाचवत वाचवत फोटो काढण्याची केविलवाणी धडपड... हे सगळं आत्ता वाचताना विनोदी वाटतंय खरं, पण तेव्हा मात्र एक दोघंजण घसरुन पडले तर काहींनी बेडूक जळवा पाहून किंचाळत उड्या सुद्धा मारल्या... पण या सगळ्यात मला मात्र कौतुक वाटत होते ते आमच्या छोट्या मेहा आणि तनुषचे...  काका भिसे तर आम्हाला एका पाठोपाठ एक प्राणी दाखवत होतेच पण हा आमचा छोटा वाटाड्या तनुष ही अजिबात मागे नव्हता. इतक्या छोट्या वयातही त्याला निसर्गाची, पशूपक्षांची  असलेली आवड सुखावत होती आणि त्याला मस्त sighting पण होत होतं.

Tanush and Meha


        या एवढ्या तीन साडेतीन तासांच्या वाटचालीत आंबोलीचा प्रसिद्ध Malabar Gliding Frog मात्र अजून दिसला नव्हता. काकांना तसं विचारल्यावर कळालं की दिवसा ते Canopy मध्ये म्हणजे झाडांच्या वरच्या भागात असतात आणि रात्री खाली झाडांच्या बुंध्यांवर येतात हे ऐकल्यावर मला जाणवलं, की आपण किती सहजपणे जंगलाचा, 'हे आंबोलीचं जंगल' असा एकेरी उल्लेख करतो आहोत जसं काही हे एक युनिटच आहे, इकडून तिकडे सारखंच..  पण खरंतर जंगलात देखील एक अदृश्य छप्पर असतं, पारदर्शक भिंती असतात आणि काळोख तळघर देखील असतं...  प्रत्येकाची territory, प्रत्येकाचा  अधिवास  पक्का ठरलेला असतो आणि त्या अधिवासात राहण्यासाठी पशुपक्षीही बाध्य असतात.. आपण कितीही "पक्षांसारखं मुक्त, स्वतंत्र" अशा उपमा वापरल्या तरी तेही काही अंशी त्यांच्या अधिवासाचे बंदीच असतात... नाहीतर चिमणीनेही घारीसारख्या उंच आकाशात घिरट्या घातल्या असत्या आणि घारीने देखील चिमणी सारखी बिनदिक्कत जमिनीलगत घरटी बांधली असती... जंगलाबद्दल आज मला काहीतरी नव्यानंच उमजलं...

        हॉटेलवर परतल्यावर मात्र  most wanted वाफाळलेला चहा आणि तोही गरमागरम भजी बरोबर मिळाला आणि अगदी जिवातजीव आला. रात्री सुद्धा मस्त जेवण झाल्यावर परत तयार होऊन ९ च्या सुमारास आम्ही night trail साठी बाहेर पडलो... सलामीलाच अगदी जोरदार पाऊस लागला... आता  दुपारसारखा उजेडही नसल्यानं हातात छत्री, कॅमेऱ्या सोबत बॅटरीचीही भर पडली होती... त्यामुळं आमचं पुरतंच ध्यान झालं होतं... हा सगळा जामानिमा सांभाळत अंधारातून कधी खडक, कधी चिखल तर कधी लहान मोठे झरे, ओहोळ यातून चालताना, आता मात्र एकेक आंबोलीची वैशिष्ठ्य पाहायला मिळू लागली...  जसा की विषारी जातीचा Malabar Pit Viper, नितांत सुंदर इंद्रधनुचे रंग अंगावर मिरवणारा, दुर्मिळ जातीचा Khaire's Shield Tail Snake, Wrinkled Frog तोही अंडी देताना, Smiling Beauty म्हणून ओळखला जाणारा पण बघता क्षणी अंगावर सर्रकन काटा आणणारा Vine Snake, Mating Amboli Toads, Caterpiller of  Giant Moth, दिमाखदार  Malabar Gliding Frog आणि त्याचं घरटं सुद्धा... अशी एकापेक्षा एक पर्वणी समोर असताना वेळेचं भानंच राहिलं नाही... रात्रीचे २ वाजले होते. डोळे पेंगुळले होते, शरीर थकलं होतं, पण "ये दिल मांगे More.. " अशीच सगळ्यांची मनःस्थिती होती... रूम वर परतताना आमच्यातल्या काहींना चहाचे वेध लागले... आणि त्यांचं नशीब पण बघा, रात्री २ वाजताही एक चहाची टपरी चक्क सुरू देखील होती... अशी सर्वार्थानं आंबोली अनुभवून समाधानानं आम्ही गाढ झोपी गेलो...

       दुसऱ्या दिवशी चिम्बोsली.. आंबोली.. च्या आठवणी मनात आणि तो हिरवाकंच निसर्ग डोळ्यात साठवून आम्ही परत या रुक्ष, निरस अशा आमच्या दैनंदिन आयुष्याकडे परत फिरलो खरं..  पण इथ परत नक्की येण्याचं मनाशी ठरवूनच...

डॉ. मनीषा शेट्टी.. 



Burrowing Frog

Bicolored Frog

Bicolored Frog

Cricket Frog (Fregervariyar species)

Design

Snail

Amboli Bush Frog - Froglets



Amboli Bush Frog - Froglets


Malabar Pit Viper


Malabar Pit Viper

Vine- full

Vine Snake

Closeup


Symmetry


Wrinkled Frog Eggs

Wrinkled Frog

Closeup







Amboli toads Mating




Amboli Leaping Frog

Malabar Gliding Frog

Malabar Gliding Frog

Malabar Gliding Frog


Khaire's Shield Tail

Khaire's Shield Tail


Khaire's Shield Tail

Patterns

Closup
   
Diamonds
Do you see me!!

Pink

Droplets

iCampers

Author Photographed!!