Wednesday 11 February 2015

भिगवण - जानेवारी २०१५

आज बरेच दिवसांनी मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. बघूया जमतंय का ? आजवर बरेचसे लेख इंग्रजीमध्ये लिहून देखील माझी बोली भाषा मराठीच आहे.  या भाषेत आपण कधी काही लिहिलं नाही अशी हुरहूर लागून राहिली होती, म्हणून हा पहिला प्रयत्न. सांभाळून घ्या.

हाक मारल्यावर लगेच १० मित्र गोळा होणं हे  सध्या Whatsapp आणि facebook या ठिकाणीच शक्य असतं असे बरेच लोकांचे म्हणणे आहे. पण हे काही सर्वस्वी खरं नाही हे मला आता ठाऊक झालंय. जर एकत्र येण्याच कारण तितकच सुंदर असेल तर मित्र गोळा होणार आणि पुन्हा पुन्हा मित्रांबरोबर मजा करता येते. आजकाल ही मजा सर्वांच्या नशिबात नसली तरी मी आणि माझे मित्र ही मजा वारंवार लुटतो.

दर वर्षीप्रमाणे हजारो मैल प्रवास करून येणारे रोहित पक्षी बघण्यासाठी आमचे सर्व मित्र वाट पाहत असतात. ते आले कि भिगवण जलाशयावरून नावाडी मला फोने करून कळवतात आणि मग एक सोयीस्कर सुटीचा दिवस पाहून मी माझ्या मित्रांना घेऊन या स्थलांतर करणाऱ्या पक्षांना बघायला जाण्याचा घाट घलतो. दर वर्षी काही नवीन आणि काही जुन्या मित्रांना घेऊन आम्ही भिगवणला जातो. या वर्षी १७ जानेवारीला आम्हा मित्रांचा पुन्हा एकदा या स्थलांतर करणाऱ्या पक्षांना बघण्याचा कार्यक्रम ठरला.

आमचा ग्रुप

माणूस कितीही सज्ञान झाला तरी पक्षी स्थलांतर का करतात, कधी करतात, त्यांना मार्ग कसा लक्षात राहतो, ते रस्ता चुकतात का, नव्यानी जन्मलेले पक्षी इतका लांबचा पल्ला कसा पार करतात, परत जायला कधी निघायचे ते त्यांना बरोबर कसे समजते असे अनेक प्रश्न १००% उत्तरीत नाहीत. शेकडो वेगवेगळ्या जातीचे पक्षी असेच दर हिवाळ्याला  महाराष्ट्रात येतात. ७-८ cm लांबीचे आणि  १०-१२g वजनाचे छोटे छोटे पक्षी हजारो मैलाचा प्रवास कसा करतात, किती दिवसात करतात आणि त्या चिमुकल्या पंखात हे बळ येत कुठून हे देखील कोडच आहे. 

प्रश्न जरी निरुत्तर असले तरी पुन्हा पुन्हा त्यांना बघण्यात आणि थोडाफार त्यांकडून आणि थोडाफार मित्रांशी चर्चा करून जाणून घ्यायचा प्रयत्न करण्यात खरी मजा आहे. ठरल्याप्रमाणे सकाळी सव्वा सहाला स्वारगेट जवळ भेटलो आणि carpool करून दीड दोन तासात भिगवणला पोहोचलो. नावाडी आमची वाटच पहात होता. या वर्षी अमाप संख्येने आलेल्या रोहित पक्षांनी देखील आमच्या डोक्यावरून भरारी मारून आणि आपले अग्निपंख दाखवून सर्वांची मन जिंकली.

रोहित पक्ष्यांचा थवा

या वेळेला रोहित पक्षांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच जास्त असल्याचा मला प्रकर्षानी जाणवलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या भीमेच्या त्या पाण्यावर असंख्य पक्षी होते. रोहित पक्षी देखील हजारोंच्या संख्येनी पाण्यामध्ये किलबिलाट करत आणि पाण्यातील alge खाण्यात गुंतले होते. नेहमी लांबवर दिसणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या किनाऱ्याकडे नाव नेणाऱ्या नावाड्याला या वेळेस फारसा प्रयास करावा लागणार नव्हता. पक्षी अगदीच जवळ आणि लगेच दिसण्याच्या अंतरावर होते. नावाड्याकडे चहा घेऊन आम्ही २०-२२ लोक २ होड्यात बसून या पक्षांना जरा  जवळून पाहण्यासाठी आणि फोटोग्राफी करण्यासाठी निघलो.

पक्षी निरिक्षण
थोड्याच वेळात जवळून जाणाऱ्या (Northern Shoveler male)  थापटया (नर) पक्ष्याने आमचे लक्ष वेधले. रुबाबदार दिसणाऱ्या या पक्ष्याच्या चोचीच्या आकारामुळे त्याला Shoveler असे नाव मिळाले आहे. त्याचा पिवळा धमक डोळा त्याच्या गडद हिरव्या रंगाच्या डोक्यावर उठून  दिसतो.

थापटया (नर)

पक्षांमधे नर हे माद्यांपेक्षा सुन्दर असतात हे आपल्याला मोर पाहून ठाऊक आहेच. तसाच प्रकार बऱ्याच पक्षांमधे दिसून येतो.

थापटया (मादी )

मासे पकडायच्या जाळ्यावर बसलेला शिरवा सुरय (Whiskered Tern) देखील फोटोची वाटच पाहत होता जणू ..

शिरवा सुरय
बघता बघता आम्ही रोहित पक्षांच्या जवळ  जाऊन पोहोचलो. मोठ्या संख्येने आलेल्या पाहुण्यांना पाहण्याची मजाच काही न्यारी आहे. खाण्यामध्ये आणि आपापसात अधून मधून भांडण्यात सगळे गुंतले होते. कधी बोटी जवळ आल्या तर आपली दिशा बदलत होते.

ऐट
Closeup
थोड़ भांडण
या सर्वांचं सम्मेलन बघून किती फोटो काढू आणि किती नको असं होतं.

Panaroma

सावधान

विश्राम

या पक्ष्यांना उडताना बघण्याची मौज काही औरच. पाण्यावरून पळत जाऊन आपल्या अग्निपनखानी आकाशाकडे झेपावणारे हे रोहित पक्षी तासंतास बघत राहावे असे वाटते. पंखाखालील लाल रंग पाहून हा पक्षी मशाल घेऊनच उडतो आहे असे भसते. त्यामुळेच या पक्षाला The Flame is going अर्थात  Flamingo असे नाव पडले असावे.

उड्डाण

The Flame is Going

Landing
थोड्याच वेळात एक मोठा रोहित पक्षांचा थवा या पक्षांना येऊन मिळाला. 

मोठा थवा
तासभर रोहित पक्षांची ऐट पाहून आम्ही इतर पक्षांना पाहण्यासाठी दिशा बदलली. सुंदर ऐटबाज राखी बगळ्यांनी (Grey Heron) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मासे पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दिमाखदार बगळ्याला आमच्या समोर तरी काही यश आलं नाही.

राखी बगळा
नंतर आम्ही जवळच्या एका किनाऱ्यावर चित्र बलाक (Painted Stork) पक्षांच्या थव्याकडे नाव वळवली. हा फारच सुन्दर आणि रंगवल्या सरखा पक्षी स्थानिक असला तरी फारच रुबाबदार आहे.

चित्र बलाक

चित्र बलाक

जोड़ी
शरीरापेक्षा उंच पाय असलेल्या शेकाट्या (Black Winged Stilt) या पक्षाला देखील चिखलात खाद्य शोधताना पाहायला मिळाले. तसा हा सांडपाणी, प्रदूषित किनारे यावर अजून टिकून राहिलेला स्थानिक पक्षी वारंवार दिसतो. शरीराच्या मानाने उंच पाय असलेल्या पक्षांमध्ये जगात सर्वप्रथम क्रमांक पटकावणाऱ्या या पक्षाला सारखा पहिला असल्याने फारसे कोणी याचे फोटो काढले नाहीत.

शेकाट्या

लेह लदाख मधून येणारा चक्रवाक पक्षी हा देखील माझा लाडका पक्षी आहे. त्याला त्याच्या स्थानिक ठिकाणी पाहून आल्यामुळे मला त्याच्याबद्दल जर जास्तच आपुलकी आहे. ६५०० km चा प्रवास आम्ही आमच्या कारनी केल्याबद्दल बऱ्याच लोकांनी आमचे कौतुक केले होते. दर वर्षी न चुकता प्रवास करणाऱ्या या पक्षाचं खरंतर किती कौतुक करायला पहिजे. या पक्ष्याकडे तर  mobile आणि google maps देखील नाहीत.

पुरातन संस्कृत श्लोकांमध्ये, सुभाशितांमध्ये आणि  कथांमध्ये आपल्या पूर्वजांनी या पक्षाचा बराच अभ्यास करून उल्लेख केला आहे. रथचक्र जसा आवाज करतं तसा आवाज काढणाऱ्या या पक्षाच नाव चक्रवाक ठेवाण्य्मागे सुद्धा जुन्या ornithologist पुर्वांजांची पक्षांबद्दलची आवड आणि अभ्यासू वृत्ती दिसून येते.

चक्रवाक (Brahminy Duck)

चक्रवाक् पक्षांची जोड़ी

इतक्या सर्व पक्षांना पुरेल इतके खाद्य या जलशयात आहे का, असा प्रश्न पडताच पाण्यावर उड्या मरणाऱ्या या माशांचे दर्शन झाले.

मासे
बाकीच्या पक्षांचे देखील सर्वानी भरपूर फोटो काढले.अनेक निरनिराळ्या बदकांमध्ये जाड भुवई असलेले Gargeni हे बदक देखील पाहिले. याचा मी प्रथमच फोटो काढू शकलो. एक सुंदर आणि जाड अशी पांढरी भुवई त्याच्या डोक्यावर पाहून मराठीमध्ये याचे  नाव भुवई असेच ठेवले आहे.

भुवई (Gargeni )
ठीबुकली हे भारतात सापडणाऱ्या बदकांच्या जातीतील बहुतेक सर्वात लहान बदक आहे. अतिशय चपळ असलेले हे बदक थोड्याश्या आवाजाने देखील पटकन पाण्याखाली जाते आणि लांब कोठूनतरी बाहेर येते. त्याला शोधण्यासाठी आपल्याला कुठे कुठे नजर फिरवावी हेच कळत नाही. 

ठीबुकली (Little Grebe)
या खेरीज काळ्या आणि तपकिरी डोक्याचे कुरव (black and brown headed gulls), वेगवेगळे सुरय (Terns) यांची पाण्यावर गर्दी होती.

काळ्या डोक्याचा कुरव (Black Headed Gull)

तपकिरी  डोक्याचा कुरव (Brown Headed Gull)

मुग्धबलाक (Open bill Stork) मोठ्या एकाग्रतेने पाण्यात काहीतरी शोधत होता. या पक्ष्याच्या चोचीमध्ये असलेल्या या फटीमुळे हा पक्षी खूप लांबून देखील ओळखता येतो.

मुग्धबलाक (Open bill Stork)

पाण्याच्या कडेला असलेल्या चिखलामध्ये या खेपेस खूप सारे काळ्या शेपटीचे  पंकज (Black-tailed Godwit) दिसले. यांची लांब लचक चोच आणि उंच पाय यामुळे हा पक्षी ओळखता येतो. बरेच दिवसांनी खूप सारे  Godwit पाहून आणि त्यांच्या लांब चोचींची तलवारबाजी बघायला खूप  मजा आली. उडताना लांब चोच आणि लांब पाय यामुळे हवेत हा पक्षी आगदी वेगळाच दिसतो.

मळगुजा, काळ्या शेपटीचा पंकज (Black Tailed Godwit)

मळगुजा, काळ्या शेपटीचा पंकज

कुदळीसारखी मोठी चोच असणाऱ्या कुदळ्या पक्षांच्या तीन जाती महाराष्ट्रात प्रामुख्याने दिसतात - Black headed Ibis, Glossy Ibis and  Black Ibis. त्यातील Black headed Ibis, Glossy Ibis या  जाती आम्ही इथेच पाहिल्या. सकाळच्या सोनेरी किरणांमध्ये चिमणा कुदळ्याचे पंख सुंदर लखलखत होते. मोठ्या चोचीने ते चिखलातील कीटक, गोगलगाई अशा अन्नाचा शोध घेताना दिसले. हा कुदळ्या इतर दोन जातींपेक्षा आकाराने छोटा असतो.

छोटा शराटी, चिमणा कुदळ्या

नौकाविहार करून झाल्यावर पायी एक चक्कर मारताना खंड्या पक्षाचे देखील दर्शन झाले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ३ प्रकारचे kingfisher दिसतात. त्या तिन्ही  (White breasted Kingfisher, common Kingfisher and Pied Kingfisher)  पक्षांना आम्ही इथे पाहू शकलो.

खंड्या (Common Kingfisher)

हिरवा बगळा (Green Heron)

नंतर नावाड्याच्याच घरी मस्त पैकी गावरान जेवणाचा आस्वाद घेतला. रोहित, भुरा बगळा, राखी बगळा आणि हिरवा बगळा यांच्या संगतीत जेवायला बसल्याचा अनुभव मिळाला. शिकारी पक्षांचे फारसे दर्शन झाले नाही असे आम्ही म्हणताच आम्हाला Marsh Harrier अर्थात पाण घार दिसली.  Wagtails (धोबी), sandpipers (तुतवार), plovers (चिखल्या), bushchats (कवड्या वटवट्या), green beaeater (वेडा राघू ) या सारखे अनेक छोटे पक्षी देखील पाहिले.

सर्व पक्षीमित्रांनी तर या सहलीची मज लुटलीच, पण मुलांनी सुद्धा आपला आपला मनोरंजनाचा पर्याय निवडला.

ओंकार
त्याच विषयावर परत परत लिहून देखील आपण माझ्या लेखामध्ये रस घेतलात या बद्दल धन्यवाद.

No comments:

Post a Comment