Wednesday 8 December 2021

नागझिरा - सुप्रिया गाडे - Nov 2022

मार्च २०२० मधेच 'नागझिरा' ला जायचं नक्की केलं होतं. बुकिंग वगैरे सगळं झालं होतं. पण आमच्या जाण्याच्या तारखांच्या सुमारासच 'कोरोना' आला आणि lockdown लागलं ! अर्थातच आमच्या 'नागझिरा' ला पण लॉक लागलं. खूप वाईट वाटलं होतं तेव्हा. प्रचंड मूड ऑफ झाला होता. 

त्यानंतर मी वाटच बघत होते केदार 'नागझिरा' कधी प्लॅन करतोय याची. यावर्षीच्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातल्या तारखा ठरल्या. 

मागच्या वेळेस रद्द झालं होतं तेव्हापासूनच 'नागझिरा' अधूनमधून मनातल्या मनात हळूच डोकावून जायचं. तारखा नक्की झाल्याने केव्हढा आनंद झाला ! खूप प्रयत्नाने ऑफिस मधून सुट्टी मिळवली. जाण्याची तारीख जसजशी जवळ येत होती, तसतशी excitement वाढत होती !

खूप उत्साहाने bags पॅक करणं..ट्रेन मधे खाण्यासाठी खाऊ घेणं अशी तयारी झाली. आमची चौदा जणांची गॅंग होती. काही मुंबईहून जॉईन होणार होते. एक मैत्रीण हैदराबादहून येणार होती. आम्ही सगळे पुणेकर्स वेळेच्या आधीच रेल्वे स्टेशन वर पोहोचलो.
आम्ही काही जण आधीपासूनच ओळखीचे होतो. काही चेहरे नवीन होते. ट्रेन मधे जरासं सेटल झाल्यावर गप्पा सुरु झाल्या. चिप्सची पॅकेट्स उघडली गेली. सगळ्यांनी रात्रीच्या जेवणासाठी घरूनच डबे आणलेले होते. पदार्थांची भरपूर व्हरायटी होती. ट्रेन मधली अंगतपंगत आणि रोजच्यापेक्षा जरा जास्तच झालेलं जेवण यामुळे झोपही छान लागली. 

सकाळी साधारण नऊच्या सुमारास 'ऑरेंज सिटी' मधे पोहोचलो. आम्हाला पिकअप करायला आलेल्या गाड्यांमध्ये बसून 'हल्दीराम' गाठलं. तिथे मस्त ब्रेकफास्ट झाला. भंडारा मार्गे गोंदियाचा रस्ता धरला. नागपूर ते गोंदिया हे अंतर almost १८६ किमी इतकं आहे. ते पार करायलाच अडीच पावणेतीन तास लागले. वाटेत थांबून 'स्पर्श' रिसॉर्ट मधे जेवण झालं. 
'उमरझरी' गाव पार केलं आणि 'नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प' असा बोर्ड असलेलं मोठ्ठं प्रवेशद्वार दिसलं. 

या गेटचं नाव मोठं गंमतीशीर होतं.  'चोरखमारा' ! या नावामागे एक छोटीशी रंजक गोष्ट आहे. 'गोंडी' भाषेमधे 'खमाटा' म्हणजे 'सोनं'. ब्रिटीशपूर्व काळात चोर सोनं लपवण्यासाठी या जागेचा उपयोग करत असत. म्हणून त्या जागेचं नाव पडलं 'चोरखमाटा.' कालांतराने याच नावाचा अपभ्रंश होऊन ते 'चोरखमारा' असं झालं. तर...या 'चोरखमारा' गेटमधून आमच्या गाड्यांनी एका वेगळ्याच...सुंदर जगात प्रवेश केला होता. 

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या मधोमध असलेल्या 'नवेगाव-नागझिरा' अभयारण्याचा विस्तार प्रचंड मोठा आहे. 
यापूर्वी 'वासोटा' आणि 'आंबोली' या दोन जंगलांमध्ये राहण्याचा अनुभव गाठीशी होता.

पण एवढ्या मोठ्या अभयारण्यात राहण्याचा हा पहिलाच अनुभव ! आमच्या या कॅम्पचं सगळ्यात मोठं आकर्षण हे होतं, की जंगलातल्या अगदी आतल्या भागात आम्ही राहणार होतो. 
'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांनी या जंगलात त्यांच्या आयुष्याची कितीतरी वर्षं व्यतीत केली होती ! हे ऐकल्यावर तर ही खूपच पवित्र भूमी आहे असं वाटायला लागलेलं !!
'नागझिरा' चं हे जंगल खूप घनदाट आहे. संपूर्ण जंगलात कुठेही कृत्रिम वीजपुरवठा नाही. जो वीजपुरवठा आहे, तो सौर ऊर्जेमधून (solar energy) केला जातो. त्यामुळे वीज अतिशय जपून वापरली जाते.  

जंगलातल्या पायवाटांवरून आमच्या गाड्या धावू लागल्या. ओपन जिप्सीजू होत्या त्यामुळे मस्त मोकळं वाटत होतं. दोन्ही बाजूला घनदाट जंगल होतं. रोजचं मेकॅनिकल, मशीनसारखं जगणं विसरून गेलो होतो आम्ही.  आपणही याच निसर्गामधे नव्यानं रुजलोय...बहरलोय...आतून भरभरून फुलून आलोय असं वाटत होतं !!

'लता कुंज' आणि 'मधु कुंज' अशी छान नावं असलेल्या छोट्याशा घरांमधे आम्ही राहणार होतो. तिथून जरा अलीकडे कॅन्टीन होतं. त्या कॅन्टीन जवळ आमच्या गाड्या थांबल्या. समोरच्या मोकळ्या आवारात भरपूर वानरं हुंदडत...बागडत होती. अजिबात न घाबरता आमच्याकडे...विशेष करून आमच्या सामानाकडे बघत होती. काहीतरी खाऊ मिळेल या आशेने ! एव्हढी वानरं आपल्या इतक्या आजूबाजूला हुंदडताना बघणं हा अनुभवही गंमतशीर होता. 

आमच्या घरांच्या अगदी समोरच एक विस्तीर्ण असा जलाशय होता. अतिशय संथ...शांत पाण्याचा. चहुबाजूने दाट झाडीने वेढलेला. त्याच्या काठावर छोटे छोटे बाक होते. त्या बाकांवर नुसतं बसून शांतपणे त्या जलाशयाच्या पाण्यावर हळुवार उमटणारे तरंग बघतच राहावं !

त्या तळ्याच्या काठी एकटंच कितीतरी वेळ बसलं, तरी वेळ कसा जात होता कळत नव्हतं. अशा वेळी दुसऱ्या कुठल्याच व्यक्तीची कंपनी नसली तरी चालतं. आपण आणि आपल्याला शांत....मूक...समजूतदार सोबत करणारं ते तळं !!
सकाळी लवकर त्या तळ्यापाशी जाऊन पाहिलं तर त्या शांत पाण्यावर पांढराशुभ्र...कापसासारखा दाट धुक्याचा पडदाच अंथरलेला असायचा !
खोलीतून बाहेर आल्यावर टप टप असा पाऊस पडल्यासारखा आवाज यायचा. पाऊस तर नव्हताच. तो आवाज असायचा दवबिंदूंचा !! हिरव्यागार पानांवर छोट्या छोट्या दवबिंदूंच्या मोत्यांचा सडा पडत असायचा !
भल्या सकाळी साडेसहा वाजता आमची जंगल सफारी असायची. लवकरच उठून...निसर्गाशी एकरूप होणारे कपडे चढवून आम्ही सफारीसाठी तयार व्हायचो. बोचरी, कडाक्याची थंडी होती. बाहेरच्या पेक्षा तसंही जंगलातलं तापमान बरंच कमी होतं. त्यामुळे अगदी गारठून गेलेलो असायचो आम्ही. पण सफारीची excitement....उत्साह वेगळाच असायचा. सकाळी सहा वाजता गरम गरम चहा-बिस्किटं पोटात ढकलून आमच्या जिप्सी मधे जाऊन बसायचो. 

जिप्सीमध्ये आमच्याबरोबर गाईड काका पण असायचे. कुठल्या स्पॉट वर काय काय दिसू शकेल याचा त्यांना अचूक अंदाज असायचा. त्याप्रमाणे त्या त्या जागेवर ते गाडी थांबवायचे. 
हिरव्यागर्द झाडीत शांतपणे फिरताना सांबरं दिसायची. आणि एक दोन नाही, त्यांचं आख्खं कुटुंबच असायचं. त्यांना बघून आमची गाडी थांबली की त्यांनाही चाहूल लागायची. न घाबरता छानपैकी एकटक आमच्याकडे बघत उभी राहायची. फोटोसाठी पोझ देत असल्यासारखी !

कित्येक टन वजन असलेले...अवाढव्य रानगवे झाडाच्या पानांचा ब्रेकफास्ट करता करता आम्हाला बघून क्षणभर थबकायचे. आमच्यावरची नजर न हलवता पुन्हा खायला सुरुवात करायचे.   
त्या हिरव्या पसाऱ्यात मधूनच मनाला भुरळ घालणारं ते अत्यंत मोहक....निळं सौंदर्य डोईवरचा तुरा आणि नाजूक नक्षीदार पंखांच्या पिसाऱ्याचं वैभव सावरत डौलात आमच्या समोरून जायचं. 

कधीपासूनच आमचे डोळे ज्याच्या शोधात होते, त्याचं दर्शन याचि देही याचि डोळा झालं आणि क्षणभर 'नागझिरा' ट्रीपचं सार्थक झालं असंच वाटलं ! आमच्या गाडीपासून अगदी सहा-सात फुटांच्या अंतरावरच बिबट्या दिसला ! रस्त्याच्या कडेला झाडीमध्ये होता. त्याने एकदाच मागे वळून आमच्याकडे पाहिलं आणि लगेचच झाडीत दिसेनासा झाला. अंगावरच्या ठिपक्यांमुळे अत्यंत देखणा दिसणारा...अतिशय चपळ...चमकदार हिरव्या डोळ्यांचा...भेदक नजरेचा...पण खूप लाजाळू आणि बुजरा असा हा हँडसम प्राणी असा निसर्गामधे मुक्त मोकळेपणाने फिरताना बघायला मिळणं म्हणजे आमचं अहो भाग्यच की !!
वन विभागाच्या गणनेनुसार या जंगलात एकूण आठ पट्टेरी वाघ आणि पंचवीस बिबटे आहेत ! त्यातला एक जरी आपल्या नजरेस पडला तरी आपला नशीबच म्हणायचं !
सात, नऊ, अकरा, तेरा अशा संख्येने कळपामधेच राहणाऱ्या...स्वतःच्या अक्कलहुशारीने सावज हेरून... क्रूर पद्धतीने त्याची शिकार करण्यासाठी कुख्यात असलेल्या जंगली कुत्र्यांचा (wild dogs) मोठा कळप आमच्या गाडीसमोरूनच रस्ता ओलांडत होता. आमच्याच एका ग्रुपचा हा 'थ्रिलिंग' म्हणता येईल असा wild dogs चा अनुभव !  

त्यांच्या जिप्सीच्या समोरून समोरून  एक छोटं सांबराचं पिल्लू जोरात पळत येत होतं. त्यांनी जरासं थांबून पाहिलं तर पाच-सहा wild dogs त्याचा पाठलाग करत होते. ते बिचारं जिवाच्या आकांताने सुटकेसाठी पळत होतं. शेवटी समोरच दिसणाऱ्या पाण्यात त्या पिल्लाने उडी घेतली आणि स्वतःचा जीव कसाबसा वाचवला ! wild dogs ना पण पोहता येतं पण ते पाण्यात उतरून शिकार करू शकत नाहीत. काही मिनिटांचाच हा पाठलाग मात्र खरंच श्वास रोखून धरायला लावणारा होता !!
काळेभोर...बोलके डोळे असणारी...तपकिरी रंगावर नाजूक आकर्षक ठिपके असणारी निष्पाप...निरागस चेहऱ्याची...गोंडस गोजिरवाणी 'ठिपकेवाली हरणं' (Spotted deers) म्हणजे या जंगलातलं एक खूपच गोड प्रकरण !! एकमेकांना सांभाळत कळपाने फिरताना...मधूनच सावधपणे आजूबाजूचा कानोसा घेत शांतपणे हळुवार पावलं टाकत रस्ता ओलांडताना दिसायची. कोवळ्या ऊन्हाची ऊब अंगावर घेत गवतात बसून राहिलेली असायची. त्यांना बघून आपोआप चेहऱ्यावर छानसं स्मित उमटायचं !! 

मधूनच आमचे गाईड काका गाडी थांबवायला सांगायचे. त्यांच्या तयार आणि अनुभवी नजरेला पायवाटेवरच्या धुळीमधे बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसायचे. त्यावरून आम्हाला समजायचं, नुकतीच स्वारी या वाटेवरून गेलेली आहे ! मग ड्रायव्हर काका त्याच वाटेवरून गाडी न्यायचे. न जाणो...एखाद्या वेळी ते रुबाबदार रूप नजरेस पडलं तर ! पण आमची निराशाच व्हायची. 'तो' त्या वाटेवरून कुठेतरी दूर निघून गेलेला असायचा !
जवळपास जर धोक्याची चाहूल लागली...म्हणजे बिबट्यासारखा मोठा प्राणी दिसला तर पूर्ण जंगलाला धोक्याची घंटा देणारे आपले मित्र म्हणजे ही हरणं आणि वानरं ! वानरं एक वेगळ्याच प्रकारचा चित्कार करतात आणि हरणं स्वतःची शेपूट वरच्या बाजूला करतात. त्यांच्या या 'alarm calls' वरूनच बिबट्या नक्की कुठे असू शकतो हे समजू शकतं. त्याचाच उपयोग वन्य जीव अभ्यासक, गाईड वगैरे मंडळी करतात. 

आम्हाला रात्री अपरात्री असे यांचे 'alarm calls' ऐकू यायचे. मग अर्धवट झोपेतच एकदम आठवायचं...अरे, आपण तर जंगलात आहोत !! 
जंगलातला रात्रीचा गर्द...मिट्ट काळोख....काळंभोर निरभ्र अथांग आकाश...आणि निसर्गाच्या त्या काळ्या कॅनव्हासवर चमचम करणाऱ्या...रात्रीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अगणित चांदण्या !! 
आमच्या घरासमोरच एक उंच मचाण बांधलेलं होतं. त्यावर चढण्यासाठी एक शिडी होती. रात्री आम्ही फक्त मुली त्या शिडीवरून मचाणावर चढलो. चांदण्यात चमचम करणारं समोरच्या तळ्यातलं शांत पाणी...भोवतीची जास्तच गूढ वाटणारी झाडं...हे सगळं त्या उंच मचाणावर उभं राहून अनुभवताना काय वाटत होतं हे शब्दात सांगताच येणार नाही !!
पहाटे जाग यायची तेव्हा आपल्याकडे कधीच ऐकली नव्हती अशी पाखरांची किलबिल ऐकू यायची.
खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्या निरभ्र आकाशात....स्वच्छंदी, मुक्त विहार करताना दिसले. आपल्या घरातलाच मेंबर वाटणारे हिरव्यागार रंगाचे राघू तर कितीतरी ! पिवळ्याधमक हळदीच्या अंगाचा...आपलं नाव सार्थ करणारा 'हळद्या' (Golden oriel)...सुरेख निळ्या रंगाचे पंख असलेला 'नीलपंख' (Roller)...लाल, मोरपंखी अशी आकर्षक रंगसंगती असलेला 'खंड्या' (Kingfisher)...लांबच लांब शेपूटवाला 'टक्काचोर' (Tree Pie)... 
अगदी एकाग्र चित्ताने झाडाच्या खोडावर चोचीने 'टकटक' करत असलेला 'सुतार' (Woodpecker)...गर्द हिरव्या रंगाचा 'वेडा राघू' (Green Bee Eater)...चमकदार काळ्या रंगाचा आणि पोटावर पांढरा पट्टा ओढल्यासारखा 'धोबी' (Wagtail)...तिन्हीसांजेला उगाचच मनाला हुरहूर लावणाऱ्या ठराविक स्वरात चित्कारणारी..पण दिसायला गोड अशी 'टिटवी' (Lapwing)...!
एखाद्या उंच झाडाच्या टोकाच्या निष्पर्ण फांदीवर गूढ..ध्यानस्थ...योग्यासारखे बसलेले 'सर्पगरूड' (Sarpent Eagle), 'मत्स्यगरूड' (Fish Eagle) आणि 'तुरेवाला शिकारी गरूड' (Crested Hawk Eagle) !! हे गरूड एकाच ठिकाणी इतके शांत...स्थितप्रज्ञ असल्यासारखे बसलेले असायचे ! आमच्या गँग मधे बरेच कुशल फ़ोटोग्राफेर्स होते. त्यांना या पाखरांनी मस्त मस्त पोझेस दिल्या फोटो काढण्यासाठी. 
सहजच वर नजर टाकली की हिरव्यागार राघूंचे थवे उडताना दिसायचे. वानरं या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत लोम्बकळताना दिसायची ! कधीतरी झाडाच्या खोडावर असलेल्या ढोलीमधे एखादं 'घुबड' (Scops Owl) जणू काही पुतळाच आहे की काय असं वाटावं इतकं स्तब्ध...शांत डोळे मिटून बसलेलं असायचं. त्याचा रंग इतका त्या झाडाच्या खोडाशी एकरूप झालेला असायचा..की ते त्या झाडाच्या खोडाचाच एक भाग आहे असंच वाटायचं !! या पक्ष्याबद्दल आजही बऱ्याच अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत आपल्या समाजात. पण अतिशय निष्पाप...निरागस असा हा आपला निसर्गातला सोबती आहे !!
खूप वेगवेगळ्या सुंदर रंगसंगतीची फुलपाखरं नाजूक पंखांची फडफड करत झुडुपांमध्ये बागडत होती.   
खूप उंचच उंच...आकाशाशी स्पर्धा करू पाहणारे वृक्ष हे या जंगलाचं अजून एक वैभव म्हणावं लागेल. साग, ऐन, तेंदुपत्ता, बेलपत्र या आणि अशा कितीतरी वृक्षांनी या जंगलाला साज चढवलाय !

या जंगलात एक खूप मजेशीर झाड बघायला मिळालं. त्याचं नाव होतं 'भुताचं झाड' (Ghost Tree) !  हे झाड प्रत्येक ऋतूमधे रंग बदलतं ! त्याचा बदललेला रंग बऱ्याचदा पांढरा असतो किंवा पांढऱ्या रंगाच्या जवळपास जाणारा असतो. हा बदललेला रंग रात्रीच्या चंद्रप्रकाशात प्रकाशाचा झोत टाकल्यासारखा चमकत असतो. अतिशय कमी पानांची संख्या आणि पसरलेल्या पांढऱ्या रंगाच्या जाड फांद्या यामुळे या झाडाला 'भुताचं झाड' असं नाव पडलंय ! एखाद्या शांत वळणावर मधेच आमचे ड्रायव्हर काका गाडी बंद करायचे. इंजिनाची घरघर पूर्णपणे थांबायची. आम्ही कुणीही मुद्दाम ठरवून एकमेकांशी काहीही बोलायचो नाही. जंगलातली 'नीरव' शांतता अनुभवायचो ! त्या शांततेला सुद्धा एक आवाज असायचा ! 

तेव्हा वाटायचं...या जंगलाला सुद्धा स्वतःचं असं मन आहे ! त्याचंही स्वतःचं असं आयुष्य आहे ! हे जंगल त्याच्या भाषेत आपल्याशी बोलायचा प्रयत्न करत असतं. आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतं. आपल्याकडे जर तेव्हढं संवेदनशील मन असेल...तर नक्कीच पोहोचेल आपल्यापर्यंत त्याला काय म्हणायचंय ते !!

आमच्या गँग मधे वेदिका, अनन्या, सिद्धांत, मिहीर या छोट्या दोस्तांपासून मेहेंदळे काका काकूंसारखे वयाने, अनुभवाने ज्येष्ठ असे सगळ्या वयोगटातले निसर्गप्रेमी होते. तसं पाहिलं तर आम्हा सगळ्यांमधे कसलंच नातं असं नव्हतं. पण आमचं सगळ्यांचंच निसर्गाशी अतूट...चिरंतन नातं होतं ! त्या नात्याशी आम्ही प्रामाणिक होतो.

सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा एकच घट्ट असा धागा होता. निसर्गाबद्दल...निसर्गातल्या निष्पाप...मुक्या सोबत्यांबद्दल खरंखुरं प्रेम ! त्यांची काळजी ! निसर्गाबद्दल आतून येणारी ओढ !
'नागझिरा' चा निरोप घेताना खूप मनापासून एकच वाटत होतं...या घनगर्द जंगलाने आपल्या उबदार कुशीत मायेने सामावून घेतलेल्या या सगळ्या मुक्या...निष्पाप...निरागस जीवांचं इथून पुढचं आयुष्यही शक्य तितकं आनंदात, शांततेत, स्वार्थी माणसांचा उपद्रव न होता व्यतीत व्हावं !! ही हिरवी निसर्गसंपदा प्राणपणाने जपली जावी !

हे जंगल जसं आहे तसं...नैसर्गिक…’ अस्पर्श’ राखलं गेलंय. संध्याकाळी साडेपाचनंतर जंगल सफारीला परवानगी न देणं...जंगलातल्या वन्य जीवांचं आयुष्य डिस्टर्ब् होऊ न देण्यासाठी शक्य तितक्या  उपाययोजना करणं यासाठी तिथल्या वनविभागाला मनापासून धन्यवाद !!

जंगलातून बाहेर पडताना मन कातर...हळवं झालंच होतं. त्या मुक्त...मोकळ्या...स्वच्छंदी...निस्वार्थी जगात आपलं काहीतरी मागे राहिलंय असं सतत  वाटत होतं ! 'नागझिरा' चा हा अनुभव खूप संपन्न करून गेला. निसर्गाशी ही जवळीक नक्कीच कुठेतरी आपलंच आयुष्य समृद्ध करून जाते  ! नाही का ?
या इतक्या सुंदर...अविस्मरणीय 'नागझिरा' कॅम्पचं सगळं श्रेय जातं 'icampers च्या केदारला. केदारच्या उत्तम नियोजनाला ! आणि त्याच्या निसर्गाबद्दलच्या...पर्यावरणाबद्दलच्या...पॅशनला !!! 

Train Travel after long time

Breakfast at Haldiram


Striped Tiger Butterfly


Sun Rays Piercing through the Fog

Reflection

Open Gypsy Safari



Sambar Deer

Green Bee Eater

Common Crow Butterfly

Scops Owl

Rofous Woodpecker

Crested Serpent Eagle

Rose Ring Parakeet


Darter


Crested Hawk Eagle



Giant Wood Spider

Racket Tailed Drongo

Spotted Deer

Oriental Honey Buzzard

Grey Headed Fish Eagle

Dhole - Wild Dog

Common Sailor

Indian Roller

Indian Roller in flight



No comments:

Post a Comment